पिता - पुत्र, काका - पुतण्या; पुण्यातील 'या' मतदारसंघातून सुरू झाली ‘कुटुंबातच आमदार’ची परंपरा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 01:47 PM2024-11-10T13:47:10+5:302024-11-10T13:49:21+5:30

अजित पवारांनी आमदारकी पवार कुटुंबातच ठेवण्याची परंपरा १९९५ पासून कायम ठेवली आहे

Father Son Uncle Nephew The tradition of MLA within the family started from constituency in Pune! | पिता - पुत्र, काका - पुतण्या; पुण्यातील 'या' मतदारसंघातून सुरू झाली ‘कुटुंबातच आमदार’ची परंपरा!

पिता - पुत्र, काका - पुतण्या; पुण्यातील 'या' मतदारसंघातून सुरू झाली ‘कुटुंबातच आमदार’ची परंपरा!

नितीन चाैधरी

पुणे : समाजकारणातून राजकारण आणि राजकारणातून समाजकारण हे तत्त्व पाळून जिल्ह्यातील अनेक घराण्यांतील पिता-पुत्रांनी आपापले मतदारसंघ राखले आहेत. कुटुंबातच आमदार होण्याची ही परंपरा १९५७ साली विठ्ठल शिवरकर यांच्यापासून पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून सुरू झाली, ती २०१९ पर्यंत कायम राहिली आहे. विशेष म्हणजे आंबेगावचे आमदार दिलीप वळसे, शिरूरचे आमदार अशोक पवार, हडपसरचे आमदार चेतन तुपे, जुन्नरचे आमदार अतुल बेनके आणि दाैंडचे आमदार राहुल कुल यांनी ही परंपरा पुढे नेण्याचे दिसत आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून १९५७ मध्ये विठ्ठल शिवरकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर आमदारकी मिळवली. नंतर त्यांचे पुत्र चंद्रकांत ऊर्फ बाळासाहेब शिवरकर हे १९९०, १९९९ व २००४ मध्ये काँग्रेसकडून आमदार झाले होते. त्यानंतर १९६२ मध्ये शिरूर मतदारसंघातून रावसाहेब पवार हे काँग्रेसकडून आमदार झाले. त्यांचे चिरंजीव अशोक पवार हे राष्ट्रवादीकडून २००९ व २०१९ मध्ये आमदार म्हणून निवडून आले. आंबेगाव मतदारसंघातून १९६७ मध्ये दत्तात्रय वळसे पाटील निवडून आले हाेते. त्यांचे पुत्र दिलीप वळसे हे त्याच मतदारसंघातून १९९० पासून २०१९ पर्यंत आमदार म्हणून निवडून आले आहेत. सुरुवातीची तीन वर्षे त्यांनी काँग्रेस आणि १९९९ पासून ते सतत राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून येत आहेत. यंदाही दिलीप वळसे राष्ट्रवादीकडूनच रिंगणात आहेत.

बारामतीत परंपरा राखणार की सुरुंग लागणार ?

भोर मतदारसंघाने १९७२ पासून २०१९ पर्यंत पिता-पुत्रांनाच संधी दिली आहे. पिता-पुत्रांसह काका-पुतण्या, भाऊ-भाऊ, सासरा-सून, पती-पत्नी, अशा जोड्यांनी जिल्ह्यातील आमदारकी कुटुंबातच कायम राखण्यात यश मिळवले आहे. बारामती मतदारसंघात शरद पवार १९६७ पासून विजयी होत आले. आमदारकी पवार कुटुंबातच ठेवण्याची परंपरा अजित पवार यांनी १९९५ पासून कायम ठेवली आहे. यंदाच्या निवडणुकीतही ही परंपरा पाळली जाईल का, याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष आहे.

पिता-पुत्र आमदार झाल्याची परंपरा १९५७ पासून

राज्यातील बहुतांश पक्षांमध्ये घराणेशाहीचा आरोप होत आहे. पक्षवाढीस योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून, ‘आम्ही कायमच सतरंज्या उचलायच्या का?’ असा प्रश्न सतत विचारला जातो. मात्र, केवळ विजयी होण्याची पात्रता अर्थात इलेक्टोरल मेरिट हेच शेवटी प्रबळ ठरून त्याच घराण्यात किंवा कुटुंबात उमेदवारी दिल्याची उदाहरणे सर्वच पक्षांत आढळतात. यंदाची निवडणूक देखील त्याला अपवाद नाही. कुटुंबातच पिता-पुत्र आमदार झाल्याची परंपरा १९५७ पासून आहे.

भाेरमध्ये थाेपटे कुटुंबाचे अर्धशतक

एखाद्या मतदारसंघाने एकाच कुटुंबातील उमेदवारी कायम ठेवून त्यांनाच निवडून देण्याची परंपरा कायम ठेवण्याची कामगिरी जिल्ह्यात आतापर्यंत केवळ भोर मतदारसंघाने जपली आहे. १९७२ पासून २०१९ पर्यंत थोपटे कुटुंबातच आमदार झाल्याचे एकमेव उदाहरण आहे. भोर मतदारसंघातून १९७२ मध्ये अनंतराव थोपटे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. त्यानंतर १९८०, १९८५, १९९०, १९९५ व २००४ मध्ये अनंतराव थोपटे सातत्याने निवडून आले. पुढे ही परंपरा संग्राम थोपटे या त्यांच्या पुत्राने कायम ठेवली आहे. त्यांना २००९, २०१४ व २०१९ मध्ये येथील मतदारांनी आमदार म्हणून पसंती दिली. यंदाही तेच आपले नशीब आजमावत आहेत.

पिता-पुत्रांनी राखला गड

- भाेर मतदारसंघावरील थाेपटे कुटुंबाचे प्राबल्य सर्वज्ञात आहेच. त्याचबराेबर शहरातीलच पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून विठ्ठल तुपे हे १९७८, १९८० व १९८५ मध्ये काँग्रेसकडून आमदार म्हणून निवडून आले. त्यांचे चिरंजीव चेतन तुपे मात्र, हडपसर मतदारसंघातून २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार झाले. चेतन तुपे पुन्हा याच मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तिकिटावर लढत आहेत.
- जुन्नर मतदारसंघाने १९८५ पासून बेनके कुटुंबालाच अधिकचे प्राधान्य दिले आहे. वल्लभ बेनके हे १९८५ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले. त्यानंतरच्या १९९०, २००४ व २००९ च्या निवडणुकांतही या मतदारसंघाने त्यांनाच संधी दिली. त्यानंतर पुत्र अतुल बेनके निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि जिंकले. आताही राष्ट्रवादीकडून ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

- दौंड मतदारसंघात देखील हिच परंपरा दिसून येते. १९९० मध्ये सुभाष कुल हे काँग्रेसकडून आमदार झाले. त्यानंतर त्यांनी १९९५ व १९९९ सालच्या निवडणुकीत जागा कायम ठेवली. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी रंजना कुल यांनी २००४ मध्ये आमदारकी मिळवली, तर त्यांचे पुत्र राहुल कुल यांनी २०१४ व २०१९ मध्ये हा मतदारसंघ कुल कुटुंबाकडे कायम ठेवला आहे. यंदाही राहुल कुल नशीब आजमावत आहेत.

काका-पुतण्यांचीही चलती

पिता-पुत्रांसह काका-पुतण्यांनीही मतदारसंघ कायम ठेवत आमदारकी मिळवल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्यात बारामती मतदारसंघ प्रसिद्ध आहे. येथून शरद पवार यांनी १९६७ ते १९९० पर्यंत वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवून या मतदारसंघावर आपले वर्चस्व कायम ठेवले. त्यांच्यानंतर त्यांचे पुतणे अजित पवार यांनीही १९९५ पासून २०१९ पर्यंत येथे आमदार म्हणून पकड घट्ट ठेवली. अजित पवार यांच्या यंदाच्या लढतीकडे सबंध राज्याचे, तसेच देशाचे लक्ष लागून आहे.

पतीची जागा पत्नीने घेतली; आमदारकी घरातच राहिली

दौंड मतदारसंघातील सुभाष कुल-रंजना कुल या पती-पत्नीनंतर चिंचवड मतदासंघातून लक्ष्मण जगताप व अश्विनी जगताप या दाम्पत्याने आमदारकी कुटुंबातच ठेवण्यात यश मिळवले. लक्ष्मण जगताप २०१४ व २०१९ मध्ये आमदार झाले. त्यांच्या निधनानंतर २०२३ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप या आमदार झाल्या. यंदाच्या निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप भाजपकडून लढत आहेत.

आमदार भाऊ-भाऊ

जयंत टिळक हे १९५७ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार झाले. त्यांच्या स्नुषा मुक्ता टिळक २०१९ मध्ये कसबा मतदारसंघातून भाजपच्या आमदार झाल्या. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून दोन भावांनी आमदार होण्याचा मान मिळवला आहे. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाने कुटुंबातच आमदारकी ठेवण्यास प्राधान्य दिल्याचे दिसते. सुरुवातीला विठ्ठल शिवरकर व त्यानंतर दिलीप व सुनील कांबळे यांना संधी दिली आहे. दिलीप कांबळे हे १९९५ व २०१४ मध्ये भाजपकडून आमदार झाले. त्यांचे बंधू सुनील कांबळे हे २०१९ मध्ये भाजपकडूनच आमदार झाले आहेत. सुनील कांबळे हे पुन्हा भाजपकडून पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून मैदानात उतरले आहेत.

Web Title: Father Son Uncle Nephew The tradition of MLA within the family started from constituency in Pune!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.