बारामती: राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबियांमध्ये फुट पडल्यानंतर बारामतीच्या राजकीय गणिताप्रमाणेच पवार कुटुंबातील नात्यांचे संदर्भ देखील बदलले आहेत. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत भाऊ अजित पवार यांच्या प्रचारासाठी मैदानात श्रीनिवास पवार उतरत असत. पण, ते यंदा मुलगा युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. रविवारी(दि २७) बारामतीचे ग्रामदैवत काशिविश्वेश्वर मंदीरात त्यांनी नारळ वाढवत प्रचार शुभारंभ केला.
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत पवार विरुध्द पवार सामना पहावयास मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी बारामती अजित पवार विरुध्द त्यांचे पुतणे युगेंद्र पवार मैदानात उतरले आहेत. अजित पवार यांच्या प्रचाराची सुत्रे त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह मुले पार्थ पवार, जय पवार यांनी हाती घेतली आहेत. तर, युगेंद्र पवार यांच्या प्रचाराची सुत्रे त्यांचे वडील श्रीनिवास पवार, आई शर्मिला पवार यांनी हाती घेतली आहेत.
रविवारी युगेंद्र पवार यांचे वडिल आणि अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांनी मुलासाठी प्रचाराचा नारळ फोडला. प्रत्येक विधानसभेला भावासाठी शड्डुू ठोकणाऱ्या श्रीनिवास यांनी आता लेकासाठी शड्डु ठोकला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी(दि २८) उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, कन्हेरी येथे प्रचारसभा घेणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री पवार मोठे शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. यूगेंद्र पवार हेदेखील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये उद्याच अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल रण्यापूर्वीच दोन्ही गटाने मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.