पुणे : आपल्याच अडीच वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्याला विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर. व्ही. अदोने यांनी जन्मठेप व ८ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपी हा मोटारचालक म्हणून काम करतो. तो आपली पत्नी व अडीच वर्षांच्या मुलीसह पिंपळे गुरव येथे राहत होता. त्याला दारूचे व्यसन होते. ३० नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी आरोपी दारू पिऊन आला व आपल्या मुलीला तू अंगणवाडी शाळेला का गेली नाही, असे विचारून मारहाण करू लागला. फिर्यादीने त्याला अडविल्यावर तिलाही मारहाण केली. फिर्यादी या स्वच्छतागृहात गेल्या असताना मुलगी रडत असल्याचा आवाज आला. त्यांनी बाहेर येऊन पाहिले तर पती मुलीवर लैंगिक अत्याचार करीत होता. त्याने दोघींना मारून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर ६ डिसेंबर रोजी त्याने अशाच प्रकारे मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली होती.
या खटल्यात विशेष सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी ७ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. न्यायालयीन कामकाजासाठी सहायक उपनिरीक्षक राजेंद्र सोनवणे यांनी सहकार्य केले. न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.