अवसरी (पुणे) : लोणी (ता.आंबेगाव ) येथील रहिवासी संदीप दत्तात्रय पोपळघट (वय :५२ वर्षे ) यांचे अपघाती निधन झाले. तर त्यांची कन्या ऋतूजा पोपळघट (वय १८ वर्षे ) ही जखमी झाली आहे. मोठी मुलगी अक्षदा पोपळघट हिचा विवाह शनिवार ( दि- ३०) रोजी दुपारी तीन वाजता थापेवाडी येथील मंगल कार्यालयात पार पडला. विवाह झाल्यानंतर सर्व धार्मिक विधी पार पाडल्यानंतर लग्न झालेल्या मुलीची पाठराखण करण्यासाठी धाकटी मुलगी ऋतुजाला पाठवायचे होते. म्हणून ऋतुजा वडिलांबरोबर लोणी येथील घरी कपड्याची बॅग आणण्यासाठी वडिलांबरोबर लोणीच्या दिशेने जात असतना बांधनवस्ती या ठिकाणी गतिरोधक आला म्हणून दूचाकी वाहन सावकाश केले. याचवेळी पाठीमागून जोरात येणाऱ्या टेम्पोने जोरात धडक दिली. या धडकेत संदिप पोपळघट हे डोक्यावर पडल्याने जबर जखमी झाले.
अपघातानंतर त्यांना प्रथम लोणी व नंतर चाकण या ठिकाणी रुग्णालयात दाखल केले. तर मुलगी ऋतूजाचा एक पाय फॅक्चर व दुसऱ्या पायाला मोठी दुखापत झाली. वडील संदिप पोपळघट यांच्यावर उपचार चालू असतानाच त्यांचे रविवार (दि- ३१) रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मूली असा परिवार आहे. बेल्हे ते जेजुरी या राज्य मार्गावर गेल्या चार पाच वर्षात अनेक मोठे अपघात झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
या रस्त्यावर शिक्रापूर त लोणी ३३ गतिरोधक असून या गतिरोधकांवर बऱ्याच ठिकाणी पांढरेपट्टे नसल्याने अपघात होतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने या गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्यात यावेत अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.