लोणावळा (पुणे) : गुन्हा दाखल असलेल्या संशयितांचा अंतिम अहवाल पाठविण्यासाठी तक्रारदार व सहआरोपीकडून मिळून एक लाख ४० हजाराच्या लाचेची मागणी करणाऱ्या लोणावळा ग्रामीणच्या सहायक पोलीस निरीक्षकावर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. देवीदास हिरामण करंडे असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक नितीन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील तक्रारदाराविरुद्ध ऑगस्ट २०२२ मध्ये लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक देविदास करंडे करीत होता. गुन्ह्याचा अंतिम अहवाल पाठविण्यासाठी त्याने ५० हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदाराने दिली होती. तक्रारीची पडताळणी केली असता, देविदास करंडे याने तक्रारदाराकडे ४० हजार व सहआरोपीकडे एक लाख रुपये असे एकूण एक लाख ४० हजाराच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले, पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, सुनील सुराडकर, भूषण ठाकूर, रियाज शेख, दीपक दिवेकर यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
आठ दिवसांत तिघे जाळ्यात-
मागील आठ दिवसातील मावळातील ही तिसरी घटना आहे. तळेगाव नगरपरिषदेचा अधिकारी, मावळचा विस्तार अधिकारी आणि शुक्रवारी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचा सहायक निरीक्षक लाचप्रकरणी जाळ्यात सापडले आहेत.