पुणे : घरी रात्री जेवण करून ते नेहमीप्रमाणे आपल्या दुस-या फ्लॅटवर जायला निघाले. दुचाकीवरून जात असताना भरधाव वेगाने येणा-या कारचालकाने जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याऐवजी कारचालकाने तिथून पळ काढला.
अपघात स्थळी उपस्थित असलेला एक व्यक्ती देवदूतासारखा धावून आला आणि त्याने वेळीच रात्री रस्त्यावर पडलेल्या या दुचाकीस्वाराला खासगी रुग्णालयात दाखल केले. कुटुंबाला त्यांच्या अपघाताची बातमी मिळाल्याने सर्वजण सुन्न झाले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तब्बल पंधरा दिवस ते कोमात होते. दस-याच्या दिवशी ते शुद्धीवर आल्याने कुटुंबाच्या जीवात जीव आला. एका कारचालकाच्या चुकीची दुचाकीस्वाराला मोठी शिक्षा भोगावी लागली. इतका गंभीर अपघात होऊनही पंधरा दिवस उलटले तरी आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांना आरोपीचा शोध लागलेला नाही. अतुल गणेश धोंगडे ( वय ५९ रा. गंगानगरी प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी अजय गणेश धोंगडे या त्यांच्या लहान भावाने फिर्याद दिली आहे. ही घटना कर्वेनगर येथील गिरिजा शंकर सोसायटी समोर रविवारी (दि.८) रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. अलंकार पोलीस ठाण्यात अज्ञात चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझा भाऊ रात्री जेवण करून आमच्या पश्चिमानगरी कर्वेनगर येथील दुस-या फ्लॅटवर चालला होता. त्यावेळी कर्वेनगर येथील गिरिजा शंकर सोसायटी समोर रविवारी (दि.८) रात्री साडेबाराच्या सुमारास एका अज्ञात चारचाकी चालकाने धडक दिल्यामुळे भाऊ गंभीर जखमी झाला. त्याला एका व्यक्तीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. माझ्या पुतण्याने फोन करून ही माहिती मला दिली. भावावर मेंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या डाव्या बरगडी आणि दोन्ही पायाला मुका मार लागला आहे असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये चारचाकी दिसत असली तरी अंधारात कारचा क्रमांक स्पष्टपणे दिसत नाही. तपास सुरूच आहे - राजेश तटकरे, पोलीस निरीक्षक, अलंकार पोलीस ठाणे
माझा भाऊ अपघात झाल्यापासून कोमातच होता. २४ तारखेला तो शुद्धीवर आला आहे. पंधरा दिवस उलटले तरी अजूनही त्या अज्ञात चालकाचा शोध लागलेला नाही- अजय गणेश धोंगडे