पुणे : अपघातांचे ग्रहण लागलेल्या नगर रस्ता बीआरटी मार्गाला प्रवाशांकडून अनुकूल प्रतिसाद दिला जात आहे. मार्ग सुरू झाल्यानंतर पहिल्या दहा दिवसांत म्हणजेच १ ते १0 मे या कालावधीत या मार्गावरील प्रवासीसंख्येत तब्बल १0 हजार प्रवाशांची वाढ झाली आहे. या कालावधीत सुमारे ७ लाख ५0 हजार ५१४ प्रवासीसंख्या नोंदविली गेली आहे. याच मार्गावर मागील महिन्यात म्हणजेच १ एप्रिल ते १0 एप्रिल या कालावधीत सुमारे ७ लाख ४0 हजार ५१४ प्रवाशांनी प्रवास केलेला होता. तर प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजअखेर ही प्रवासीवाढ सुमारे २६ हजारांहून अधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे.या मार्गावर सध्या ८ डेपोच्या सुमारे २५ मार्गांवरील बसेस धावत असून, दररोज त्यांच्या सुमारे १६९0 फेऱ्या होत आहेत. एप्रिल महिन्यात या मार्गावरून दररोज सरासरी ७४ हजार ५४ प्रवासी होते. ही संख्या मे महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत ७५ हजार ५१ वर पोहोचली आहे. त्यातच उन्हाळी सुट्ट्या असल्याने पुढील महिन्यात शाळा तसेच महाविद्यालये सुरू झाल्यानंतर ही प्रवासीसंख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तब्बल तीन वर्षांहून अधिक काळ बांधून तयार असलेला येरवडा ते वाघोली हा १३ किलोमीटरचा बीआरटी मार्ग महापालिकेकडून अर्धवट काम झाले असतानाही २८ एप्रिल रोजी घाईगडबडीने सुरू करण्यात आला आहे. या १२ किलोमीटरच्या हद्दीतील सुमारे ९ किलोमीटरचा मार्ग महापालिका हद्दीत असून, ही बीआरटीची स्वतंत्र (डेडिकेटेड) लेन आहे. त्यामुळे एरवी हे अंतर पार करण्यासाठी लागणारा पाऊण तासाचा वेळ आता अवघ्या २0 ते २५ मिनिटांवर आला आहे. त्यामुळे या मार्गावर अपघात होत असले तरी वेळेची बचत करण्यासाठी या मार्गाला पसंती दिली जात आहे.
नगर रस्ता बीआरटीला अनुकूल प्रतिसाद
By admin | Published: June 01, 2016 1:42 AM