पुणे : फर्ग्युसन रोडवरील एल ३ नामक पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन केल्याचा दावा करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शनिवारी (दि. २२) पहाटे ५ वाजेपर्यंत हा पब सुरू असल्याचे देखील व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले होते. त्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. शिवाजीनगरपोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल माने, रात्रपाळीदरम्यान शनिवारी गस्तीवर असणारे सहायक पोलिस निरीक्षक दिनेश पाटील यांना निलंबित करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले. याप्रकरणी पब मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांनादेखील कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्याचे आदेश परिमंडळ -१ चे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांनी रविवारी दिले.
कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पुणे पोलिस, उत्पादन शुल्क विभाग आणि महापालिकेने कल्याणी नगरसह शहरातील विविध भागांत असलेल्या पबवर कारवाईचा बडगा उगारला. बेकायदा बांधकामे, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी धडक कारवाई करण्यात आली होती. मात्र, अशातच फर्ग्युसन रस्त्यावरील द लिक्वीड लिझर लाउंज (एल ३) पबमध्येच पहाटे पाचपर्यंत सुरू असलेल्या पार्टीत प्रसाधनगृहात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची चित्रफीत रविवारी प्रसारित झाल्यानंतर खळबळ उडाली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची चाैकशी करून कारवाईचे आदेश दिले होते.