पुणे: विना परवाना चहा विक्री करणा-या विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनातर्फे (एफडीए)कारवाई करण्यात आली.मात्र,विना परवाना चहा विक्री करणा-या व्यावसायिकांना चहा तयार करण्यासाठी लागणा-या साहित्याची विक्री करणा-या दुकानदारांवरही एफडीएकडून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.चिक्की उत्पादकांनंतर एफडीएने चहा विक्रेत्यांकडे आपला मोर्चा वळविल्याचे बोलले जात आहे.पुणे शहरात विना परवाना किंवा विना नोंदणी चहा विक्री करणा-या अमृततुल्य व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध एफडीएने धडक मोहिम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत येवले अमृततुल्य, साईबा अमृततुल्य तसेच प्रेमाचा चहा यांच्यावर कारवाई करण्यात आली.तसेच विना परवाना विक्री करणा-यांना तात्काळ उत्पादन थांबविण्याचे आणि विक्री न करण्याचे आदेश देण्यात आले.एफडीएने सुमारे महिना भरापूर्वी लोणावळा परिसरातील चिक्की उत्पादकांविरोधात मोहिम सुरू केली होती. सर्व चिक्की उत्पादकांना नियमांचे पालन करण्याबाबत एफडीएने नोटीसा बजावल्या. त्यानुसार संबंधितांनी आपल्यात आवश्यक बदल करून कायद्याचे पालन करण्यास सुरूवात केली. आता चहा विक्रेत्यांविरोधात एफडीएने मोहिम सुरू केली आहे. एफडीएचे पुणे विभागीय सह आयुक्त संजय शिंदे म्हणाले, चहासाठी लागणारी चहापत्ती व इतर साहित्याची विक्री करणारे विक्रेते त्यांनी चहाचा व्यावसाय करणा-यांकडे परवाना आहे किंवा नाही. हे तपासूनच आपल्याकडील मालाची (चहा साहित्य) विक्री करणे आवश्यक आहे. चहापत्ती विक्रेते काही चहाची विक्री करणा-या व्यावसायिकांना थेट दुकानात चहा साहित्य पोहच करतात. त्यामुळे संबंधितांकडे परवाना असल्याची खात्री करूनच चहाच्या सहित्याची विक्री करावी. विना परवाना चहा विक्री करणा-यांना आवश्यक साहित्याची विक्री केल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. येवले अमृततुल्य,साईबा अमृततुल्यबरोबरच गुरूवार पेठेतील प्रेमाचा चहावरही कारवाई करून त्यांना दहा हजार रुपयांचा दंड करण्यात आला. प्रेमाचा चहाच्या मालकांनी एफडीएकडे दंडाची रक्कम भरली आहे.
विना परवाना चहा विक्री करणा-या विक्रेत्यांनंतर त्यांना साहित्य पुरवणाऱ्यांवरही एफडीएची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2019 4:03 PM
येवले अमृततुल्य, साईबा अमृततुल्य तसेच प्रेमाचा चहा यांच्यावर कारवाई करण्यात आली.
ठळक मुद्देविना परवाना चहा विक्री करणा-या अमृततुल्य व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध एफडीएची धडक मोहिम