बेलाजी पात्रे, वाकडगुटखाबंदी निर्णयाचा गैरफायदा उठवून पानटपरीचालकांना लुटणारी टोळी वाकड, थेरगाव, हिंजवडी परिसरात कार्यरत आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे भासवून टपरीचालकांना भीती दाखवायची, त्यांच्याकडून पैसे उकळायचे असा टोळीचा नित्यक्रम टपरीचालकांना हैराण करणारा आहे. बंदी असूनही टपऱ्यांमध्ये गुटखाविक्री होते. त्यावर पोलीस प्रशासनाचा अंकुश नाही. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. या परिस्थितीचा फायदा उठवून टपरीचालकांना हैराण करणाऱ्या टोळीकडे कोणाचेही लक्ष नाही. टपरीवाले बंदी असताना छुप्या पद्धतीने गुटखाविक्री करत असल्याने ते पैसे उकळणारे कोण, याबाबत माहिती घेण्यात अधिक खोलात जात नाहीत. ‘हक ना बोंब’ अशी त्यांची अवस्था झाली आहे. पोलीस नाही, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी नाही, त्यामुळे ही टोळी ‘चोरावर मोर’ बनली आहे. टपरीचालकांना ते आपण अन्न व औषध प्रशासनाच्यातपासणी पथकातील अधिकारी आहोत, असे सांगतात. त्यांच्याकडून पाच ते दहा, पंधरा हजार रुपये या पटीत रक्कम उकळतात. एखाद्या टपरीधारकाने फोनवरून अन्य कोणाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास विश्वास नाही का, कोणाशी संपर्क साधणार, असा दम भरतात.चार-पाच जणांची साध्या वेशातील ही टोळी मोटारीने येते. टपरीपासून काही अंतरावर मोटार थांबविली जाते. यापैकी एकाच्या हातात छोटा कॅमेरा असतो. काहीजण टपरीची झडती घेण्यास सरसावतात. एखाद-दुसरी गुटख्याची पुडी सापडलीच, तर ती टपरीचालकाच्या हातात देऊन फोटो काढले जातात. यामुळे टपरीचालक भांबावतो, भयभीत झालेला विक्रेता असेल तेवढी रक्कम देण्यास तयार होतो. ही रक्कम घेऊन टोळी पसार होते.
गुटखाविक्रेत्यांची लूट करणारे ‘एफडीए’चे तोतया अधिकारी
By admin | Published: November 25, 2015 12:51 AM