पुणे : सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे नागरिकांना चांगलेच महागात पडत आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) अशा तब्बल ६३६ नागरिकांवर कारवाई केली असून, त्यांना तब्बल ८६ हजार ५१० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सिगारेट व इतर तंबाखुजन्य पदार्थ जाहिरातींवरील प्रतिबंध, व्यापार, उत्पादन, पुरवठा आणि वितरण अधिनियम कायदा २००३ नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास प्रतिबंध आहे. केंद्र व राज्य सरकारचे प्रशासकीय अधिकारी, आरोग्यसेवा, विक्रीकर, प्राप्तीकर, परिवहन, केंद्रीय अबकारी विभागाचे निरीक्षक, पोलीस,पंचायत राज संस्थेचे पदाधिकारी, पोस्टमास्टर व त्या पदावरील अधिकारी, विमानतळ व्यवस्थापक, भारतीय विमानतळ प्राधिकरण अधिकारी यांना सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचा अधिकार आहे. या शिवाय शाळा, महाविद्यालयांचे प्रमुख, मुख्याध्यापक, जिल्हा धिक्षण अधिकारी, पुस्तकालय अधिकारी, बसस्थानक प्रमुख, तिकीट तपासणीस, वाहतुक अधिक्षक, सरकारी वकील, निबंधक, सहाय्यक निबंधकांना देखील अशी कारवाई करता येऊ शकते. मात्र, यातील हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच संस्था कारवाई करताना दिसतात. माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी ही माहिती उघड केली. एफडीएने २०१३ पासून डिसेंबर २०१७ अखेरीस ६३६ व्यक्तींवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून ८६ हजार ५१० रुपयांचा दंड वसुल केला. या काळात २०१५-१६ आणि २०१६-१७ साली सर्वाधिक कारवाई करण्यात आली. या वर्षी अनुक्रमे २३६ आणि १७२ जणांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून ३४ हजार १०० आणि २० हजार ५०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. पाठोपाठ २०१४-१५ साली १०१ जणांवर कारवाई करीत १५ हजार ५० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तर, डिसेंबर २०१७ अखेरी पर्यंत ४६ जणांना ७ हजार २०० रुपयांचा दंड करण्यात आला.
एफडीएने ‘फुकरें’ना ठोठावला दंड : सहाशे जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 4:56 PM
सिगारेट व इतर तंबाखुजन्य पदार्थ जाहिरातींवरील प्रतिबंध, व्यापार, उत्पादन, पुरवठा आणि वितरण अधिनियम कायदा २००३ नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास प्रतिबंध आहे.
ठळक मुद्देतब्बल ६३६ नागरिकांवर कारवाई , पाऊण लाखांचा दंड वसुल