पुणे: दौंड तालुक्यात खामगाव व केडगाव येथील गूळ उत्पादकांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली.त्यात ३ लाख ७२ हजार ५१ रुपये किमतीचा गूळ जप्त करण्यात आला. तसेच गुळ उत्पादकांना एफडीएच्या अधिका-यांनी तात्काळ गूळ उत्पादन थांबविण्याचे आदेश दिले.परंतु,सर्व तृटींची पूर्तता केल्यानंतर गुळाची निर्मिती पुन्हा सुरू करता येईल,असेही एफडीएने स्पष्ट केले.
दौंड तालुक्यातील खामगाव येथील अनुज गूळ उद्योगचा ३ हजार ६०० किलो गूळावर कारवाई करण्यात आली.या गूळाची एकूण किंमत ९० हजार रुपये आहे. तसेच सुयश गूळ उद्योगच्या ६३ हजार रुपये किमतीच्या २ हजार ५२० किलो गूळावर कारवाई झाली. त्याचप्रमाणे शिवम एंटरप्रायजेसच्या १ लाख २८ हजार ३३१ किमतीच्या ६ हजार १११ किलो वजनाच्या गूळावर कारवाई केली. तर केडगाव येथील एस.पी.गूळ उद्योगाच्या ९० हजार ७२० रुपये किमतीच्या ३ हजार ७८० किलो गूळावर कारवाई करण्यात आली.
सर्व प्रकारच्या अन्न पदार्थ उत्पादकांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून परवाना घेणे बंधनकारक आहे.गूळ उत्पादकांनी नियमानुसार ३ हजार रुपये शुल्क भरून परवाना घेणे बंधनकारक आहे.परंतु,या उत्पादकांनी केवळ १०० रुपये शुल्क परवाना घेतला आहे. त्याचप्रमाणे गूळ उत्पादन करताना गु-हाळाचा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. परंतु, एफडीएच्या अधिका-यांनी केलेल्या पहाणीत गु-हाळाचा परिसर अस्वच्छ असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे खाण्यासाठी योग्य नसलेल्या रंगाचा वापर गूळामध्ये केला जात असल्याचे अढळून आले.त्यामुळे एफडीएच्या अधिका-यांनी सर्व उत्पादकांना उत्पादन थांबविण्याचे आदेश दिले.