ओतूर : नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील बनकर फाटा (ता. जुन्नर) येथे पथारीवाल्यांची अतिक्रमणे वाढू लागल्याने येथे छोटे अपघात नेहमीच घडतात. परंतु दिवसेंदिवस रस्त्यावरील ही अतिक्रमणांत वाढ होत आहे. ही परिस्थिती बदलली नाही तर मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.बनकर फाटा येथे सकाळ-संध्याकाळ मजुरांची गर्दी असते. रोजगार मिळावा म्हणून आदिवासी विभागातून शेकडो मजूर बनकर फाट्यावर येतात. त्या वेळी खूप गर्दी होते. सायंकाळी ५ नंतर मजूर घरी जाण्यासाठी याच बनकर फाटा बसथांब्यावर येतात. या ठिकाणी अगदी रस्त्याला खेटून काही पथारीवाले बसतात. काहींच्या हातगाड्या असतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा येतो.या महामार्गाने एसटी महामंडळाच्या नगरकडून कल्याणकडे व कल्याणकडून नगरकडे जाणाऱ्या बस आहेत. सुमारे १५० बस नगरकडे, १५० कल्याणकडे जाणाऱ्या आहेत. याशिवाय शेकडो मालवाहू ट्रक, खासगी वाहने यांची सतत वर्दळ असते. याच फाट्यावरून कल्याणकडून जुन्नर घोडेगावकडे जाणाऱ्या एसटी बसेस मालवाहू ट्रक खासगी वाहने जातात. जुन्नरकडे जाणाऱ्या वाहनांना कोपऱ्यावर पथारीवाले बसतात. त्यामुळे वाहनचालकांना वाहने वळविताना धोका वाटतो. बसमधून उतरणाऱ्या व बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना पथारीवाल्यांमुळे उतरता येत नाही तसेच बसमध्ये चढणाऱ्यांना चढता येत नाही. यामार्गाने दररोज जाणारे प्रवासी ओतूर पोलिसांकडे तक्रारी करतात. पोलीस दखल घेतात व पथारीवाल्यांना तेथून हटवितात परंतु परत जैसे थे परिस्थिती होते. (वार्ताहर)
वाढत्या अतिक्रमणांमुळे अपघाताची भीती
By admin | Published: April 19, 2017 4:07 AM