पुणे : कोरोना विषाणूच्या संसर्गाने नागरिकांना नको तेवढा धसका घेतला असून, एखाद्या व्यक्तीला मदत करायलाही कोणी धजावत नसल्याचे फर्ग्युसन रस्त्यावर सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास पहायला मिळाले. महाविद्यालयाजवळील बसथांब्यावर मास्क बांधून बसलेला तरुण अचानक बेशुद्ध झाला. तब्बल अर्धातास तो बेशुद्धावस्थेत पडून होता. परंतु, शेकडो बघ्यांपैकी कोणीही त्याच्या मदतीला धावले नाही.फर्ग्युसन महाविद्यालया जवळील बसथांब्यावर साधारणपणे २५ वर्षांचा एक तरुण बसची वाट पहात बसलेला होता. त्याने कोरोनाच्या भितीनेच तोंडाला मास्क बांधलेला असावा. हा तरुण अचानक बसथांब्यावरच बेशुद्ध पडला. त्याच्या शेजारी असलेले सर्व प्रवासी बाजूला पळाले. बघता बघता त्याच्याभोवती शेकडो बघ्यांची गर्दी जमा झाली. त्याच्या तोंडाला मास्क असल्याने कोणीही या तरुणाला उठविण्याचा किंवा त्याला सावध करण्याचा प्रयत्न केला नाही. तब्बल अर्धा तास केवळ चर्चा आणि विविध निष्कर्ष काढण्यात गुंतलेली बघ्यांची गर्दी या तरुणाला मदत करायला तयार होत नव्हती.याच वेळी रस्त्याने जात असलेले यासीन पाशा शेख (रा. अश्विनी हाईट्स, मार्केट यार्ड) यांनी गर्दी पाहून गाडी बाजूला घेतली. गर्दीमधून वाट काढत त्यांनी पुढे जाऊन पाहिले असता त्यांना हा तरुण बेशुद्ध पडल्याचे दिसले. त्यांनी पुढे जाऊन त्याला सावध करण्याचा प्रयत्न केला. परंतु, गर्दीतील लोकांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही.अरे याला कोरोना असेल, तुलाही लागण होईल अशी भीती घातली. तरीही शेख यांनी त्याला मदतीची गरज आहे. तो वेगळ्या कारणानेही बेशुद्ध पडला असेल, असे म्हणत मुलाला सावध करण्याचा प्रयत्न केला. प्रतिसाद मिळत नसल्याने त्याच्या मोबाईलवरुन वडिलांना फोन करुन माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनाही माहिती दिली.
कोरोनाची भीती : मास्क बांधलेला तरुण बेशुद्धावस्थेत, भीतीने मदतीला नाही कोणी धावले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 5:36 AM