पिंपरी : चार सदस्यांचा एक प्रभाग या नव्या प्रभाग रचनेला सर्व राजकीय पक्ष सामोरे गेले असले तरी आता प्रत्यक्ष मतदान जवळ येऊन ठेपल्यानंतर उमेदवारांना मतदार एकाच वेळी चार मते एकाच पक्षाला देईल का, याविषयी शंका वाटते आहे. अशा क्रॉस व्होटिंगच्या शक्यतेने पक्षाकडून पॅनेल निवडून आणण्याची जबाबदारी घेतलेले उमेदवार चिंताक्रांत झाले आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक बहुतेक वेळा पक्षावर नाही तर उमेदवाराच्या मतदारांशी असलेल्या वैयक्तिक संपर्कावर होते. तसे होऊ नये, यासाठी भाजपाच्या सरकारने जाणीवपूर्वक चार सदस्यांचा एक प्रभाग अशी नवी रचना केली असल्याची टीका होत होती. लहान पक्षांचे अस्तित्व धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त करीत भारिप बहुजन महासंघ व अन्य काही पक्षांनी या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र पुढे त्यावर त्यावर फारशी चर्चा न करता सर्व राजकीय पक्षांनी ही नवी रचना स्वीकारली.एरवी एका प्रभागातील मतदार संख्या साधारण ४ ते ५ हजारांपर्यंत असायची. यावेळी मात्र चार सदस्यांचा एक प्रभाग केल्यामुळे प्रभागाचे भौगौलिक क्षेत्र वाढले आहे. मतदारांची संख्याही ६० हजारांपेक्षा जास्त आहे. बहुसंख्य पक्षांनी चारही जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. पक्षीय व प्रभाग स्तरावरही सर्वांचा एकत्रित प्रचारही सुरू आहे. मात्र एका प्रभागात एका मतदाराची चारही मते एकाच पक्षाला मिळतील का, याविषयी उमेदवार साशंक असल्याचे दिसते आहे. असे क्रॉस व्होटिंग झाले तर प्रभागामध्ये संपूर्ण पॅनेल निवडून येण्याची शक्यता मावळली असल्याचे काही उमेदवार बोलून दाखवत आहेत. मतदान यंत्रांवरील उमेदवारांच्या नावांच्या रचनेमुळेही ही शंकेत तथ्य असल्याचे दिसते आहे. चारही प्रभागांना अनुक्रमे अ, ब, क, ड अशी नावे आहेत. त्यांना पांढरा, फिका गुलाबी, फिका पिवळा, फिका निळा असे रंग आहेत. वरच्या बाजूस अ गट व त्याखाली त्या गटातील उमेदवारांची अल्फा बेटीकली नावे व त्यासमोर त्यांचे चिन्ह असेल. अखेरची ओळ नोटा (यापैकी एकही पसंत नाही) ती संपल्यानंतर त्याच मतदान यंत्रावर एक ओळ सोडून ब गट सुरू होईल. त्याचा वेगळा रंग असेल. त्यावर त्या गटातील उमेदवारांची नावे असतील. शेवटी नोटाचा पर्याय असेल. हीच रचना ड गटापर्यंत असेल. दोन मतदान यंत्रांवर सर्व उमेदवारांची नावे बसली नाहीत तर तिसरे यंत्र वापरण्यात येईल. (प्रतिनिधी)
‘क्रॉस व्होटिंग’ची भीती
By admin | Published: February 18, 2017 3:12 AM