लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : डांगे चौक, थेरगावात वाहनांची तोडफोड करून सशस्त्र दहशत माजविण्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला. थेरगाव परिसरात दीड वर्षात घडलेली ही तिसरी घटना आहे. थेरगाव, कैलासनगरमध्ये स्थानिक गुंडांच्या वर्चस्ववादातून नागरिकांमध्ये दहशत माजविण्याचे प्रकार घडू लागले आहेत. ६ जानेवारी २०१६, १४ मे २०१६ आणि २३ जुलै २०१७ ला एकाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. काळेवाडी, वाकड आणि हिंजवडी पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाल्यामुळे वारंवार या भागात अशा घटना घडत असल्याची पूर्ववैमनस्यातून सात ते आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तरुणाने चपळाईने तेथून पळ काढला. ज्याच्यावर हल्ला करायचा होता,तो हातचा निसटून गेल्याने टोळक्याने आरडाओरडा करीत परिसरातील वाहनांची, घरांची तोडफोड करून दशहत माजविली. ही घटना थेरगावातील कैलासनगर येथे शुक्रवारी रात्री घडली होती. याप्रकरणी सहा साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आणि आरोपी एकाच परिसरात राहत असून, एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांच्यात पूूर्वीपासून वादंग आहे. त्या रागातून आरोपींनी हातात लोखंडी कोयते, लाकडी दांडके, रॉड घेऊन कैलासनगरमध्ये धुडगूस घातल्याचे निष्पन्न झाले आहे. ही अलीकडे घडलेली ताजी घटना असून, यापूर्वीही अशा घटना याच परिसरात घडल्या आहेत. वारंवार घडत असलेल्या अशा घटनांमुळे नागरिक दहशतीखाली आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरावे की नाही असा प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. दहशत माजवून कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.चिंतेची बाब : अल्पवयीन मुलांचा सहभाग वाहनांवर दगडफेक करणाऱ्या आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग दिसून येत आहे, ही चिंतेची बाब आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, तसेच अल्पवयीन मुले चुकीच्या व्यक्तीच्या संगतीत येऊन बिघडू लागल्याने पालकवर्ग चिंतेत आहे. स्थानिक गुंंडांमध्ये वर्चस्ववादातून असे प्रकार घडू लागले आहेत. त्यांच्या वर्चस्ववादात इतरांना वाहनदुरुस्तीचा भुर्दंड सोसावा लागतो आहे.मोटारींना केले जाते लक्ष्यडांगे चौक, थेरगावात १४ मे २०१६ ला वाहनांवर दगडफेकझाली होती. सुमारे २२ वाहनांचे नुकसान झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींवर कारवाई केली होती. शिव कॉलनी, गणेशनगर, थेरगाव आणि मारुंजी येथील एकाला वाकड पोलिसांनी त्या वेळी अटक केली होती. हिंजवडी रिक्षाथांब्यावर रात्री हातात लाकडी दांडके घेऊन दोघांना मारहाण करून हल्लेखोर पसार झाले होते. तेथील सहा आसनी मोटारीची तोडफोड केली होती. काळेवाडीतील तापकीरनगर भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादातून दोन ते तीन अल्पवयीन मुलांनी सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या मोटारीची तोडफोड केली होती.
भय इथले संपत नाही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 3:02 AM