लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ठेवीमध्ये निम्म्याने घट झाली असून, विद्यापीठाने आपल्या खर्चावर नियंत्रण आणून उत्पन्नात वाढ केली नाही, तर पुढील चार ते पाच वर्षांत विद्यापीठाच्या ठेवी संपुष्टात येण्याची भीती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य व्यक्त करत आहेत.
कोरोनामुळे बँकांनी व्याजदरात मोठी कपात केली. त्यामुळे विद्यापीठाला ठेवींच्या व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी घट झाली. तसेच गेल्या काही वर्षापासून केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विद्यापीठाला मिळणारा निधी पूर्णपणे बंद झाला. त्यामुळे विद्यापीठाची आर्थिक स्थिती चिंताजनक झाली आहे. त्यातच विद्यापीठात सुरू असणाऱ्या विविध बांधकामासाठी विद्यापीठ फंडातील ३० ते ४० कोटींचा निधी खर्च होत आहे.
शासनाने विद्यापीठातील रिक्त झालेली पदे भरण्यास मान्यता दिली नाही. त्यामुळे विद्यापीठ प्राशासनाला विद्यापीठ फंडातून शिक्षक व शिक्षकेतर पदांवर शेकडो कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या कराव्या लागल्या. त्यांचे वेतन अदा करण्यासाठी दर वर्षी विद्यापीठ फंडातील तब्बल ६० कोटी रुपये खर्च होत आहेत. शासनाने पद भरतीस मान्यता दिल्याशिवाय हा खर्च कमी करता येणार नाही.
गेल्या चार वर्षात विद्यापीठाच्या ठेवी १८० कोटीने कमी झाल्या आहेत. मात्र, विद्यापीठाच्या स्थावर मालमत्तेत २४० कोटीने वाढ झाली आहे. यंदा विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात काही खर्चावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. परंतु, विद्यापीठाने अद्याप उत्पन्न वाढीच्या साधने निर्माण केली नाही. त्यामुळे हीच परिस्थिती कायम राहिली तर विद्यापीठाच्या ठेवी संपुष्टात येतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
चौकट
शासनाने थकवली रक्कम
पाच-सहा वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे सुमारे साडेपाचशे कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. दरम्यानच्या काळात यातील तब्बल यातील अडीचशे कोटी रुपये दरम्यानच्या काळात विविध कारणांसाठी खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे ठेवींमध्ये मोठी घसरण झाली आहे. शासनाकडून शंभर कोटी रुपये वेतनापोटी विद्यापीठाला मिळणे अपेक्षित आहे. मात्र ते मिळत नसल्याने ठेवींमधील घसरण रोखणे विद्यापीठास अवघड होत चालले आहे.