पुणे : दमा तसेच ‘सीओपीडी’ आजार असलेल्यांमध्ये काेराेनापश्चात फुप्फुसांच्या विविध तक्रारी वाढल्या आहेत, अशी माहिती केईएम हॉस्पिटलचे फुप्फुसविकारतज्ज्ञ डॉ. पराग खटावकर यांनी दिली.
केईएम हॉस्पिटल रिसर्च सेंटरतर्फे श्वसनविषयक आजारांबाबत समाजात जनजागृतीसाठी ‘ओळख माेकळ्या श्वासाची’ हा लघुपट तयार करण्यात आला आहे. त्याचे बुधवारी रुग्णालयातील सभागृहात सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.
डाॅ. खटावकर म्हणाले, ‘‘काेराेनाकाळात ज्या नागरिकांना दमा किंवा सीओपीडी हा श्वसनविषयक आजार हाेता व त्यांना काेराेना झाला त्यांच्यापैकी काही रुग्णांच्या फुप्फुसामध्ये फायब्राेसिस तयार झाल्याचे दिसून येत आहे. दम्याचा आजार असलेल्या रुग्णांना काेरोनानंतर बंद झालेली औषधे पुन्हा सुरू करावी लागली आहेत. ज्यांना दम्याचा काेणताही त्रास नव्हता, त्यांना काेराेनापश्चात फुप्फुसाचा काेणताही त्रास दिसून येत नाही.
या लघुपटाच्या माध्यमातून ग्रामीण भागात श्वसन आरोग्याविषयी जागरूकता, प्रतिबंधात्मक उपाय, उपलब्ध उपचार आणि पुनर्वसन, सीओपीडी आणि दमा याबाबत माहिती देण्यात आली आहे. पंधरा मिनिटांचा हा लघुपट असून युकेमधील युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गमधील एनआयएचआर ग्लोबल हेल्थ रिसर्च युनिट इन रेस्पिरेटरी हेल्थ (रेस्पायर) यांच्या आर्थिक सहकार्याने तयार करण्यात आला आहे. या लघुपटाच्या निर्मिती प्रक्रियेचे समन्वयन दीक्षा सिंग यांनी केले.