बाजाराच्या परिसरातच पहाटेच शेतकरी आपला शेतमाल विक्री करण्यासाठी आणत असतात, आठवडे बाजारासमोरील रस्त्यालगत बसतात. त्यामुळे महामार्गाकडे जाणाऱ्या वाहनांची व शेतकऱ्याची मोठी गर्दी होत आहे. यामुळे स्थानिक नागरिक व प्रवास करणारे प्रवासी यांचे हाल होत आहेत. पूर्व हवेेेली परिसरात उत्तरोत्तर कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या बाजारामध्ये बहुतांश खरेदीदार व विक्रेते विनामास्क असतात. तसेच खरेदीदार हे पुणे परिसरातून येत असतात. येथे होत असलेल्या गर्दीमुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. कोरोना संसर्ग वाढल्याने येथील आठवडे बाजार प्रशासनाने बंद ठेवला आहे. असे असतानाही रोज सकाळी या ठिकाणी मोठी गर्दी जमलेली असते. बाजार रस्त्यावर भरत असल्याने वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच विक्रेते उर्वरीत व सडका शेतमाल तेथील मोकळ्या मैदानात फेकत असल्याने या परिसरात दुर्गंधी पसरत आहे व या दुर्गंधीमुळे लोकाच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका खासगी कंपनीचे सफाई कर्मचारी सदर कचरा उचलतात. परंतु एखाद्या दिवशी तो उचलला गेला नाही तर दररोजचा बाजार अथवा महामार्गाकडे जाणा-यांना याचा त्रास सहन करावा लागतो. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे ही बाब लक्षात येताच ग्रामपंचायत प्रशासनाने गावांतील सर्व दुकाने व दररोज भरत असलेली भाजीमंडई शुक्रवार (१६ एप्रिल) पासून सकाळी ७ ते दुपारी २ या कालावधीत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
आठवडे बाजारातील गर्दीमुळे कोरोनाची लागण वाढण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 4:11 AM