Omicron Variant: नव्या विषाणूच्या भितीमुळे पुन्हा नियमांत बदल केले; अजित पवारांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 09:11 PM2021-11-30T21:11:56+5:302021-11-30T21:12:07+5:30
गेल्या दोन दिवसांत मुंबई विमानतळावर परदेशातून आलेले जवळपास एक हजार प्रवासी उतरले. त्या सर्वांची चाचणी करण्यात आली. मात्र, नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे
पुणे : आफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रॉन या नव्या विषाणूचा संसर्ग वेगाने होतो. त्यामुळे याचा धोका असल्याने राज्य सरकारने पुन्हा निर्बंध कायम केले आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नाट्यगृहे १०० टक्के सुरु करण्याची दिलेली परवानगी तसेच आदी निर्णय बदलावे लागल्याची माहिती, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिली. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्यावतीने आयोजित एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
पवार म्हणाले, पुण्यात शुक्रवारी नाट्यगृहे सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. त्यावेळी नव्या विषाणूच्या संसर्गाची तिव्रता सर्वाधिक असल्याचे जाणवले नाही. मात्र, गेल्या दोन दिवसांत मुंबई विमानतळावर परदेशातून आलेले जवळपास एक हजार प्रवासी उतरले. त्या सर्वांची चाचणी करण्यात आली. मात्र, नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. ६ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सरकारची बैठक झाली. त्या बैठकीत या संसर्गाबाबतचा धोक्यावर चर्चा झाली. त्यामुळे राज्यात निर्बंध लागू करण्याचा निर्णय घ्यावा लागला. याच परिस्थितीमुळे शुक्रवारी पुण्यासाठी घेतलेला निर्णय बदलावा लागला, अशा शब्दांत निर्णयामागील भूमिका अजित पवार यांनी स्पष्ट केली.
''आफ्रिकेतून आलेल्या रुग्णाला विलगीकरणात ठेवण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. तसेच पुण्यात घेतलेल्या निर्णयाऐवजी राज्य सरकारच्यावतीने जे निर्णय जाहीर होतील त्याची पुण्यात अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे पवार म्हणाले.''
कोणाला नेमायचे हा मुख्यमंत्र्याचा अधिकार
मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची मुदत संपल्याने त्यांच्या जागी देवाशिष चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आली. त्याबाबत विचारता अजित पवार म्हणाले, सध्या अप्पर मुख्य सचिवांकडे कार्यभार देण्यात आला आहे. माझी दुपारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. एखाद्या मुख्य सचिवांची मुदत संपल्यानंतर तेथे कोणाला नेमायचे किंवा त्याला नियुक्त करायचे हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जो निर्णय घेतात त्यांच्या पाठीशी आम्ही उभे ठाम असतो. केंद्र सरकारने कोणत्या कारणास्तव मुदतवाढीचा प्रस्ताव नाकारला ते पहावे लागेल.
नियमात नियुक्ती असेल तर घेऊ
पुणे महापालिकेत समाविष्ट केलेल्या तेवीस गावांमधील ग्रामपंचायतींच्या नोकरभरती संदर्भात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. आपल्या नेमणुका नियमानुसार आणि ग्रामपंचायतीला असणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये झालेले आहेत. जिल्हा परिषदेकडून यादी पाठवली जात नसल्याने आमचे पगार गेल्या तीन-चार महिन्यांपासून रखडले असल्याचे सांगितले त्यावर अजित पवार यांनी माझ्याकडे आलेली आकडेवारी वेगळी आहे. कर्मचाऱ्यांच्या नेमणुका नियमानुसार झाले असतील तर तुम्हाला घेऊ असे स्पष्ट केले.