फुरसुंगी : पुणे ते पंढरपूर पालखी मार्गावर सासवडनजीक असलेल्या दिवेघाटात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसाने येथील रस्त्यालगतचे दगड निसटून रस्त्यावर येत आहेत. डोंगराच्या बाजूने चर आहे. मात्र, तो लहान असल्याने डोंगरावरून येणारे दगड हे सरळ वेगाने रस्त्यावर येत आहेत. यामुळे वाहनास व नागरिकांना धोका निर्माण झाला आहे.
याच दिवे घाटातून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जाते. रस्ता रुंद आहे. मात्र, सासवडहून हडपसरच्या बाजूकडे येणाऱ्या वाहनांना काही वळणावर दरड कोसळण्याची भीती आहे. येताना वाहने ही डोंगराच्या बाजूने येत असतात. हे दगड निसटल्याचे दुरूनही दिसत आहेत. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. हे दगड रस्त्यावर येऊ नयेत, म्हणून संरक्षक जाळी बसवण्यात यावी. त्याचप्रमाणे जे दगड पडण्याच्या अवस्थेत आहेत ते काढून बाजूला सारावेत, अशी मागणी स्थानिक नागरिक व वाहनचालक करीत आहेत. पावसाळ्यात दिवे घाटातील रस्त्यावर दोन- तीन दिवसांपासून बाजूच्या दरडीवरील दगड अचानक रस्त्यांवर येत आहेत. त्यामुळे प्रवासी वाहनांची मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. रस्त्याच्या बाजूला चारही असली तरी उंच ठिकाणचे दगड चारीतून रस्त्यावर येत आहेत. काही दगड तर पूर्णपणे रस्त्याच्या मधोमध आले होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन याची दुरुस्ती करून वाहतूक सुरक्षित करावी, अशी मागणी होत आहे.