माळेगाव (पुणे) : माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा होताच गावातील गटातटाचे राजकारण डोके वर काढण्याची भीती व्यक्त होत आहे. नगरसेवक होण्यासाठी युवा कार्यकर्ते साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करण्याची शक्यता यंदाच्या राजकारणात नाकारता येणार नाही. राजकारणात आडवा येणाऱ्याची कशी जिरवाजिरवी करायची याचे पद्धतशीरपणे नियोजन होण्याचे आडाखे आखले जात आहेत.
शाळा-कॉलेजांत शिकणाऱ्या लहान मुलांकरवी घातक हत्यारांचा सर्रासपणे वापर करण्यास या मुलांना प्रवृत्त केले जात असल्याची शक्यता वाढीस लागली आहे. आत्मघाती हल्ले करण्यास फूस लावली जाते. मुलांच्या भविष्याशी खेळले जात आहे. या मुलांना विविध प्रकारचे आमिष दाखवले जाते. महागडे मोबाईल घेऊन देतो, हौसमौज करण्यासाठी पैसे देतो, या ना त्या कारणांनी या मुलांकडून समोरच्याचा काटा काढायचा; आपले राजकीय वलय प्रस्थापित करायचे, असे उद्योग माळेगावमध्ये सर्रासपणे आढळून येत आहेत.
रविवारी माळेगाव कारखाना येथील तुळजाभवानी मातेच्या मंदिरासमोरील मोकळ्या जागेमध्ये महेश उत्तम पैठणकर यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. त्यांना तत्काळ बारामती येथील खासगी दवाखान्यांमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत असल्याचे सांगण्यात येत आहे.
गुन्हेगार कितीही मोठा असला तरी त्याची गय केली जाणार नाही. गावातील दहा ते पंधरा वर्षांपासून गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या सर्वांचेच रेकॉर्ड तपासले जाणार आहे.
- अनिल अवचर,
पोलीस निरीक्षक, माळेगाव पोलीस ठाणे