कात्रज: रायगडातील इर्शाळवाडीमध्ये दरडी कोसळल्यानंतर पुणे परिसरातील कात्रज डोंगरारांगाजवळ वसलेल्या गावात दरडी कोसळण्याची भीती पसरली आहे. पुणे जिल्ह्यातील व शहरालगत असणारी अनेक गावे अशीच धोकादायक असल्याचा अहवालदेखील समोर येत आहे. विशेषत: दक्षिण पुण्यातील कोळेवाडी, जांभूळवाडी, भिलारेवाडी, मांगडेवाडी, गुजर निंबाळकरवाडी ही गावे डोंगर भागात व डोंगररांगांच्या आसपास वसलेली आहेत.
पूर्वीपासून या गावाच्या आसपास नैसर्गिक नदी, नाले, ओढे वाहतात; परंतु, आता बरीचशी नष्ट झालेली आहेत. तसेच या भागात शेकडो वर्षांपासून जुन्या असणाऱ्या डोंगररांगादेखील आहेत. या भागातील नागरिकांकडून माहिती घेतली असता भविष्यकाळात शेकडो वर्षे जरी गेली तरी नैसर्गिक दरड कोसळण्याचा धोका कमी असल्याचे नागरिकांनी सांगितले; परंतु, या गावातील भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भूमाफियांकडून डोंगर पोखरणे चालू आहे. त्यामुळे डोंगर भाग नष्ट होत असून नैसर्गिक आपत्ती येण्याचा धोका बळावला आहे.
दरड कोसळण्याच्या घटना या पावसाळ्यामध्ये घडतात. दक्षिण पुण्यातील कोळेवाडी, जांभूळवाडी, भिलारे वाडी मांगडेवाडी, गुजर निंबाळकरवाडी या गावातील डोंगर भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भूमाफियांकडून नियम धाब्यावर बसून मोठ्या प्रमाणात डोंगर पोखरणे सुरू आहे. त्यामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडली तसेच डोंगर खचणे यांसारख्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कोळेवाडीत अधिक भीती
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव शिवकाळापासून सुमारे साडे तीनशे ते चारशे वर्षांपासून वसलेले आहे; परंतु, आज गावालगत सिमेंटचे जंगल वाढत चालले आहे. भूमाफियांकडून अनधिकृतपणे डोंगर पोखरण्याचे काम चालू आहे. गावाचे नैसर्गिक सौंदर्य आणि नैसर्गिक संपत्ती धोक्यात आहेच; पण त्याचबरोबर गावकऱ्यांच्या जीवालादेखील धोका आहे. माळीन, इर्शाळवाडी यांसारखी नैसर्गिक आपत्ती नव्हे तर मानवनिर्मित नैसर्गिक आपत्ती आदिवासी पाडा कोळेवाडीवर येऊ शकते, असे गावकरी सांगत आहेत.
शासनाने ठोस पावले उचलावीत
कोळेवाडी आमच्या गावातील नागरिकांना दरड कोसळणाऱ्या घटना घडत असल्यामुळे भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे डोंगर, टेकड्या फोडणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करून गावालगतच्या डोंगरांचे संवर्धन करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत. - आदिवासी पाडा युवक समिती, कोळेवाडी.
भूमाफियांमुळेच जास्त धोका
दक्षिण पुण्यातील असणाऱ्या डोंगर भागामध्ये झोन व प्रशासनाचे नियम झुगारून डोंगर पोखरण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यामुळे निसर्ग संपत्तीबरोबरच मानवी जीवनदेखील धोक्यात येत आहे. या गोष्टीची कल्पना असूनदेखील याकडे डोळेझाक केली जात आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून योग्य ती कारवाई केली तरच पुढे घडणाऱ्या अशा मोठ्या घटना टळू शकतील, असे नागरिकांचे म्हणणे आहे.