भाजपाकडून दहशत व अमिषाचे राजकारण: पृथ्वीराज चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 08:15 PM2019-04-03T20:15:32+5:302019-04-03T20:20:37+5:30
भाजपचा एकाही कार्यकर्ता किंवा संघाची विचार धारा असणा-या व्यक्ती भाजपने निवडणूकीसाठी उमेदवारी म्हणून दिला नाही.
पुणे: भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणुकीत दहशतीचे आणि अमिषाचे राजकारण केले जात आहे. साम, दाम, दंड,भेद यावर भाजपचे सुरू असलेले राजकारण दुदैवी आहे,असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच ज्यांनी प्रसंगी तुरूंगवास सोसून भाजप पक्षाला सत्ता मिळवून दिली. त्यापैकी भाजपचा एकाही कार्यकर्ता किंवा संघाची विचार धारा असणा-या व्यक्ती भाजपने निवडणूकीसाठी उमेदवारी म्हणून दिला नाही.अनेक उमेदवार काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षातून आयात केले आहेत.भाजपला याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे.मात्र, महाराष्ट्रातील जनता त्यांच्याकडे काळजीपूर्वक पाहत आहेत,असेही चव्हाण यांनी नमूद केले.
कॉँग्रेस पक्षाचे पुण्याचे लोकसभेचे उमेदवार मोहन जोशी यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला.याप्रसंगी खासदार वंदना चव्हाण,आमदार विश्वजीत कदम,शहराध्यक्ष रमेश बागवे,प्रवीण गायकवाड,संगीता तिवारी आदी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, भाजपकडून व्यक्ती केंद्रीत राजकारण केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्याच प्रचारसभेत मिळालेला प्रतिसाद पाहता मोदी लाट पूर्णपणे ओसरली आहे. मागील निवडणूकीत मोदींनी दिलेली आश्वासने किती पूर्ण झाली त्याचे आकलन लोकांनी केलेले आहे. त्यामुळे मागील निवडणूकीत दिलेल्या अश्वासनांचे काय झाले, असे लोक भाजपला विचारत आहेत.
काँग्रेसने प्रकाशित केलेला जाहीरनामा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे.या जाहिरनाम्यातील मुद्यांसह शेतक-यांचे प्रश्न, बेरोजगारी, नोटबंदी आणि जीएसटीमूळे सर्व सामान्य नागरिक आणि व्यापा-यांचे नुकसान झाले आहे. तसेच राफेलमधील घोटाळा या मुद्द्यांवर काँग्रेसतर्फे प्रचार केला जाणार आहे.
मावळ येथील शेतकरी गोळीबारावर ते म्हणाले, या प्रकारच्या घटनांबाबतचे आदेश कधीही राजकीय स्तरावर दिले जात नाहीत. स्थानिक परिस्थीती पाहून तेथील प्रमुख पोलीस अधिकारी यावर निर्णय घेत असतात. परतु, या घटनेची सर्व चौकशी व इतर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.त्यामुळे हा मुद्दा केवळ राजकीय आरोप करण्यापुरता उरला आहे.