पुणे : सुमारे ३ वर्षापूर्वी त्याने एकाच्या खुनाचा प्रयत्न केला होता. त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचे २ आणि मारामारीचा एक असे तीन गुन्हे दाखल होते. पूर्वीच्या या गुन्ह्यातून आपल्याही जीवाचे काही बरे वाईट होईल, अशी भीती त्याला नेहमी वाटत होती. त्यासाठी तो आपल्याजवळ पिस्तुल बाळगत होता. त्याच्यावर कोणी हल्ला केला नाही. पण, पिस्तुल बाळगत असल्याची कानोकानी खबर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाला मिळाली. अन् तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
अनिकेत राजेंद्र लांडे (वय २१, रा. मादगुडेवाडी, पो. तांबड, ता. भोर) असे त्याचे नाव आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पोलीस अंमलदार अमोल पवार यांना माहिती मिळाली की, एक मुलगा भवानी पेठेतील सोनाईदाद प्रतिष्ठाणजवळ पिस्तुल घेऊन उभा आहे. या माहितीची खात्री करुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले, यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस अंमलदार अमोल पवार, अजय थोरात, इम्रान शेख, आय्याज दड्डीकर, योगेश जगताप, महेश बामगुडे, सतीश भालेकर, शशिकांत दरेकर यांनी त्या ठिकाणी जाऊन अनिकेत लांडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल व ३ जिवंत काडतुसे मिळून आली. त्याच्याविरुद्ध मार्केटयार्ड, बिबवेवाडी, हवेली पोलीस ठाण्यात ३ गुन्हे दाखल आहेत. अधिक तपासासाठी न्यायालयाने १९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
रेकॉर्डवरील गुन्हेगार सोमागौडा गुरन्ना चौधरी (वय २८, रा. आंबेडकर नगर, मार्केटयार्ड) हा हा कात्रज कोंढवा रोडवर थांबला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाला माहिती मिळाली.पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी पिस्तुल व ३ काडतुसे मिळून आली. सोमागौडा चौधरी याह सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत व घरफोडी असे चोरीचे गुन्हे दाखल आहे. सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले, उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे व त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली