पुणे : त्याने ११ वर्षांपूर्वी एकाचा खून केला होता. त्यामुळे त्याला भीती वाटत होती. त्यातून त्याने स्वत:जवळ पिस्तूल बाळगले होते. याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाला मिळाली अन् पोलिसांनी त्याला सापळा रचून पकडले.
सचिन अप्पा रणदिवे (वय ३१, रा. शनिनगर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगार तपासणी करीत असताना अंमलदार दत्ता सोनावणे व महेश बामगुडे यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन रणदिवे हा मीरा सोसायटी येथील रस्त्यावर उभा असून त्याच्याकडे पिस्तूल आहे. या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सचिन रणदिवे याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून १ पिस्तूल व १ काडतूस असा ५१ हजार रुपयांचा माल जप्त केला. अधिक चौकशी केली असता त्याने २०१० मध्ये एकाचा खून केला होता. त्याच्यापासून त्याला जीवाची भीती वाटत होती. त्यामुळे त्याने पिस्तूलजवळ बाळगले असल्याने सांगितले. सचिन रणदिवे याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी असे ३ गुन्हे दाखल आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, संजय गायकवाड, पोलीस अंमलदार दत्ता सोनावणे, महेश बामगुडे, अशोक माने, शशिकांत दरेकर, विजयसिंग वसावे यांनी ही कामगिरी केली.