पुणे : एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संप मोडीत काढण्यासाठी एसटी प्रशासनाने शनिवारपासून संपात सहभाग घेतलेल्या कर्मचाऱ्यांचा बदल्या करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा कर्मचाऱ्यांनी धसका घेतला असून ते आता कामावर परतत आहेत. रविवारी पुणे विभागातील पाचवा आगार सुरू झाला आहे. रविवारी बारामती आगाराच्या २० साध्या गाड्या जिल्ह्यात विविध ठिकाणी धावल्या. रविवारपासून बारामतीच्या रूपाने पुणे विभागाचा पाचवा आगार सुरू झाला. या आधीच स्वारगेट, शिवाजीनगर, दौंड,चिंचवड असे चार आगार सुरू झाले आहेत.
दोन दिवसांपूर्वी परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांनी कामावर परतावे अन्यथा त्यांच्यावर मेस्मा अंतर्गत कारवाई करू असा इशारा दिला. मात्र ते शक्य नसल्याने एसटी प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरू केले. शनिवारी पुणे विभागातील ८८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्याचा परिणाम रविवारी दिसून आला. रविवारी बारामती आगाराच्या ४० वाहक व चालक कामावर परतले. त्या नंतर बारामतीमधून परिवर्तन बसची वाहतूक सुरू झाली. बारामतीहुन नीरा, भिगवण, फलटण, जेजुरी, दौंड या ठिकाणसाठी गाडी धावल्या.
''रविवारी बारामती विभागातून एसटीची वाहतूक सुरू झाली. कर्मचारी आता कामावर परतत आहेत. बारामती आगारातून २० गाड्या धावल्या आहेत असे पुणे विभागीय वाहतूक अधिकारी ज्ञानेश्वर रनवरे यांनी सांगितले आहे.''
आम्ही मागे हटणार नाही
''कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून त्यांना भीती दाखवली जात आहे; पण आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत. प्रशासनाला कोणती कारवाई करायची ती करू द्या. आम्ही आता मागे हटणार नसल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.''