पुणे : इमारत विक्रीच्या बहाण्याने ज्येष्ठाकडून पैसे हडप करून प्रॉपर्टी न विकता सराईत आंदेकर आणि घिसाडी गँगची भीती दाखवित व्यवहाराव्यतिरिक्त ३ कोटींची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अशोक आत्माराम शर्मा, सीमा अशोक शर्मा, हेमंत आत्माराम शर्मा (मयत) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. रामचंद्र तोताराम मुलतानी (वय ७२, रा. नगर) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी रामचंद्र आणि आरोपी अशोक यांचे व्यापारी संबंध आहेत. त्यातूनच २०१६ मध्ये अशोकने रामचंद्र यांना पुण्यातील गणेश पेठेतील चार मजली इमारत विक्री करण्याचा बहाणा केला. त्यासाठी त्याने त्यांच्याकडून वेळोवेळी ४ कोटी ८० लाख रुपये घेतले. त्यानंतर अशोक यांनी रामचंद्र यांना चार मजली इमारतीची व्रिकी न करता फसवणूक केली. त्याने रामचंद्र यांना सराईत आंदेकर आणि घिसाडी गँगची भीती दाखवून ठरलेल्या व्यवहाराव्यतिरिक्त ३ कोटी रुपये जास्तीची मागणी करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी खडक पोलीस तपास करीत आहेत.