लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राजकारणी जसा स्वत:च्या आवाजाच्या प्रेमात असतो, तसाच इनोव्हेटरही आपल्या कल्पनेच्या प्रेमात असतो. मात्र, अशा वेळी व्यवहारिकतेचे भान सुटण्याची शक्यता असते. त्यामुळे नवकल्पनांची व्यावहारिकता तपासणे आणि त्यानुसार स्टार्टअप्स इन्क्युबेशनसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस (एसओपी) तयार करणे गरजेचे आहे, असे मत खासदार व भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष (आयसीसीआर) डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी गुरूवारी (दि. १०) व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू करण्यात आलेल्या इनक्युबेशन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात सहस्त्रबुध्दे बोलत होते. पर्सिस्टंट सिस्टिमचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव प्रफुल्ल पवार, सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अॅण्ड एन्टरप्रायजेसच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले की, नव्या व्यवसाय संधी निर्माण करणाऱ्या अभ्यासक्रमांची देशात कमतरता असून रचनात्मक अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी विद्यापीठांनी पुढे यायला हवे. पारंपारिक इनक्युबेशन पद्धती पलीकडे जाऊन मानवी जिव्हाळ्याचा स्पर्श असलेले, पाठीवर कौतुकाची थाप देणारे इनक्युबेशन सेंटर आपण साकारायला हवे. इनक्युबेशन सेंटरने ग्रामीण आणि आदिवासी भागातील नवसंशोधकांपर्यंतही पोचायला हवे.
डॉ. आनंद देशपांडे म्हणाले, “नवउद्योजकाला बाजाराची उपलब्धता, आर्थिक पाठबळ, मार्गदर्शन आणि शिफारशीची गरज असते. विद्यापीठाने चांगल्या नवउद्योजकांना पाठबळ देणे गरजेचे आहे.” उद्योगांबरोबरच विद्यापीठांनाही सामाजिक उत्तरदायित्व असते. त्याच भावनेतून विद्यापीठाने अभिनव उपक्रम हाती घेतले असल्याचे कुलगुरु डॉ. करमळकर म्हणाले.