पुणे : दारू पिऊन शिवीगाळ करीत चारित्र्यावर संशय घेण्याच्या पतीच्या त्रासाला कंटाळून नैराश्यात असलेल्या एका डॉक्टर महिलेने इंजेक्शनचा डोस घेऊन राहत्या घरी आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार वारजे माळवाडी परिसरात घडला. याप्रकरणी वारजे पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.
मनिषा रमेश कदम (वय ४५, रा. वारजे माळवाडी, मूळ मेढा) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेचे नाव आहे. रमेश नारायण कदम (रा. वेन्ना चौक,ता. मेढा, जि. सातारा) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी डॉक्टर महिलेची आई मालन अलसे (वय ६६, वारजे माळवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
मयत मनिषा आणि त्यांचे पती दोघेही व्यवसायाने डॉक्टर आहेत. पतीचे सातारा जिल्ह्यातील मेढ्यात हॉस्पिटल आहे. २००६ मध्ये मनिषाचा विवाह झाला. रमेश नेहमी दारुच्या नशेत तीला मारहाण करत होता. तसेच चारित्र्याच्या संशयावरुन शिवीगाळ करत असे. त्यातूनच अनेकदा उपाशी ठेवले जात होते. त्याने मनिषाला माहेरी सोडल्यावर पुन्हा नांदण्यास नेले नाही. मागील काही महिन्यापासून त्या माहेरी आपल्या आई-वडिलांकडे वास्तव्यास होत्या. काही दिवसांपासून त्या पालिकेच्या रुग्णालयात काम पहात होत्या. कोविडच्या काळात देखील स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून त्यांनी आपले कर्तव्य निभावले. एकाच दिवशी दहा महिलांची प्रसूती करण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या सासरच्या मंडळीसोबत समोपचारासाठी बैठक देखील झाली होती. त्यावेळी पतीने त्यांना सासरी नेण्यास नकार दिला होता. त्यांची मोठी मुलगी पतीकडे वास्तव्यास होती तर लहान त्यांच्यासोबत होती. त्यांना मुलीली भेटता येत नव्हते. त्यामुळे मागील काही दिवसापासून त्या नैराश्यात होत्या. त्यातून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी इंजेक्शनचा डोस घेत आत्महत्या केली.