लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: कोरोनामुळे आलेली बेरोजगारी, व्यवसायात अपयश यातून खचलेल्या मनांना उभारी द्यायचे काम कनेक्टिंग ट्रस्टच्या माध्यमातून होते आहे. विनामूल्य हेल्पलाईनद्वारे समुपदेशन करून अशा व्यक्तींवर उपचार होतात.
आत्महत्या रोखण्याच्या उद्देशाने अर्णवाझ दमानिया यांनी पुण्यात सन २००५ मध्ये ''कनेक्टिंग ट्रस्ट'' ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली. या संस्थेतील समुपदेशक दूरध्वनी संवादाच्या माध्यमातून तणावग्रस्तांचे मन हलके करतात. पुणे पोलीस, ससून जनरल हॉस्पिटल यांच्या सहकार्याने ''सुसाईड सर्वायव्हर सपोर्ट प्रोग्राम'' राबविला जात आहे.
लॉकडाऊन कालावधीत व्यथा मांडणाऱ्या ईमेलची संख्या १५ ते ४५, तर कॉलची संख्या १६० च्या पुढे असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली. आत्महत्येचा विचार करणाऱ्यांमध्ये युवकांचे प्रमाण अधिक झाले असल्याचेही संस्थेतील समुपदेशकांचे निरीक्षण आहे.
पुण्यातून सुरु झालेले हे काम दिल्ली, हरियाणा, औरंगाबाद, नागपूर, हिंगणघाट, पनवेल या ठिकाणीही सुरू आहे. ''कनेक्टिंग ट्रस्ट''चे सीईओ लियान सातारावाला याचे नियोजन करतात. फोन करणाऱ्यांचे नाव, सर्व माहिती गुप्त ठेवली जाते, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.