लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील अॅमेनिटी स्पेस दीर्घ मुदतीकरिता भाडेतत्त्वावर देण्याच्या भाजपच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसने सशर्त पाठिंबा दिला असला, तरी काँग्रेस शिवसेनेने या प्रस्तावाला आपला विरोध कायम ठेवला आहे़ शहरातील अॅमेमनिटी स्पेसची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव पुणेकर सहन करणार नाहीत, अशी भूमिका या दोन्ही पक्षांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे़ यामुळे महापालिकेतील महाविकास आघाडीत फूट पडली असल्याची चर्चा रंगली आहे़
शिवेसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी, अॅमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्यास आमचा तीव्र विरोध असल्याचे सांगून या निर्णयाविरोधात राज्य सरकारकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे़ तर काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी, मूठभर धनदांडग्यांच्या हितासाठी पुणेकरांना वेठीस धरून महापालिकेचे उत्पन्नवाढीच्या गोंडस नावाखाली अॅमेनिटी स्पेस विकू नये, अशी भूमिका मांडत या प्रस्तावाविरोधात मतदान करणार असल्याचे जाहीर केले आहे़
--------------------
अॅमेनिटी स्पेस भाड्याने देण्यास आपचा विरोध
अँमिनिटी स्पेसचा उद्देश बदल हा बेकायदेशीर व नागरी हक्कांवर गदा आणणारा आहे़ त्यामुळे शहरातील अॅमेनिटी स्पेस दीर्घकालीन म्हणजे ३० वर्षांच्या करारावर देण्याच्या योजनेला आम आदमी पार्टीने जाहीर विरोध केला आहे.
-------------------------