राजगुरुनगर : येथे मंगळवारी (दि. २) दिवसभर विविध कार्यक्रमांद्वारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राजगुरुनगर नगरपरिषद, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महात्मा गांधी विद्यालय आदींनी सहभाग घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, युवकाध्यक्ष कैलास लिंभोरे, महिलाध्यक्षा संध्या जाधव, सभापती चंद्रकांत इंगवले, शहराध्यक्ष सुभाष होले यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ येथील विद्यार्थी आणि शिक्षक यांनी जयंतीनिमित्त गावातून प्रभात फेरी काढली. नंतर बालसभा झाली. गांधींच्या वेशभूषातील विद्यार्थी रोहन सांगडे व जाधव यांचे पालकांनी अभिनंदन केले. सूत्रसंचालन द. मा. पिंगळे यांनी केले तर आभार द्वारकादास बैरागी यांनी मानले. राजगुरुनगर नगरपरिषदेत नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी प्रतिमपूजन केले. सर्व नगरसेवकांनी राहुल चौक येथे स्वच्छता अभियानात भाग घेतला. पूर्वसंध्येला सर्व सफाई कर्मचाऱ्यांना विशेष सन्मानित करण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०१९ यात अव्वल क्रमांक येण्यासाठी त्यांना प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ देऊन प्रोत्साहित केले.महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जयंती कार्यक्रमात सहायक जिल्हाधिकारी तथा खेडचे उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रचंड दृढनिश्चय व अखंड आत्मविश्वासाच्या बळावर संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवता येते, हीच गांधीची मूलभूत विचारसरणी होती, असे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे संचालक गणेश घुमटकर, विद्यालयाचे प्राचार्य सुनील जाधव, उपमुख्याध्यापिका संध्या कांबळे, पर्यवेक्षक विलास खोमणे, दशरथ पिलगर, पांडुरंग डावरे, बाळासाहेब गाडेकर विद्यार्थी व अध्यापक वर्ग उपस्थित होता. प्रसाद पुढे म्हणाले की गांधीजींच्या विचारसरणीने जागतिक दर्जाच्या तत्त्ववेत्त्यांवर प्रभाव टाकला. सत्य, अहिंसा, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकात्मता, प्रामाणिकपणा या तत्त्वांनी अनेक महामानवांना प्रेरणा दिली. नितीमूल्यांच्या जोरावर तुम्ही कोणत्याही मोठ्या शक्तीचा अथवा शत्रूचा पराभव करू शकता. साधी राहणी, उच्च विचारसरणी हे गांधी तत्त्वज्ञानाचे मूळ होते. त्यामुळेच सूयार्चा अस्त न होणाºया इंग्रजी साम्राज्यास त्यांनी हादरा दिला. तुमचा जर तुमच्या तत्त्वांवर व मूल्यांवर विश्वास असेल, तर शत्रूही तुमचा आदर करतो हे गांधीच्या तत्त्वज्ञानाने जगाला दाखवून दिले.याप्रसंगी विद्यालयातील अध्यापिका स्मिता निकम यांनी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जीवनपटावर आपले मनोगत व्यक्त केले. जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरण कनिराम चव्हाण यांच्या स्मरणार्थ ठेवलेल्या ठेवीतून देण्यात आले. यावेळेस सुनील कहाणे, संध्या कांबळे, मकरंद बोरकर यांचा सत्कार करण्यात आला. स्वच्छता अभियानांतर्गत विद्यालयात घेण्यात आलेल्या निबंध, वक्तृत्व, रांगोळी, चित्रकला या स्पर्धांचे बक्षीस वितरण या वेळेस करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत व ईशस्तवन सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संध्या कांबळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय लतीफ शाह यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिता पाठक, सविता शिंदे यांनी केले. विलास खोमणे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमासाठी फलकलेखन अजय रोकडे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन तुळशीराम घोलप, अर्चना गोडसे, माधुरी काळभोर यांनी केले.