शेलपिंपळगाव : खेड तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील गावांमध्ये गावठी दारूगुत्त्यांचा, तसेच जुगार अड्ड्यांचा सुळसुळाट झाला आहे. या व्यवसायांवर कायदेशीर कारवाई करण्यात पोलीस प्रशासन डोळेझाक करीत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. याविरोधात महिला आक्रमक झाल्या असून येथील अवैध धंदे बंद न झाल्यास अधिका-यांना घेराव घालण्याचाइशारा शेलपिंपळगाव येथील महिलांनी दिला आहे. व्यावसायिकांनी अडचणींच्या ठिकाणी गावठी दारूचे गुत्ते उभारले असून या गुत्त्यांमधून छुप्या मार्गाने गावठी दारूची विक्री केली जात आहे. शेलपिंपळगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेलगत, पाण्याच्या टाकीशेजारी, दावडी रोडवरील चौधरीवस्ती, बैलगाडा शर्यतींचे घाट आदी ठिकाणी गावठी दारू, तसेच ताडी विकली जात आहे. तसेच वडगाव-कोयाळी गावच्या परिसरातील दक्षिणवाहिनी भीमा-भामा नदीच्या पात्रात राजरोसपणे दारूगुत्ते सुरू आहेत. यापूर्वी ग्रामस्थांनी एकत्र येऊन येथील दारूगुत्ता उद्ध्वस्त केला होता. मात्र, संबंधित व्यावसायिकांनी तो पुन्हा सुरू केला आहे. शेलपिंपळगाव-दावडी रस्त्यावर विद्युत कक्षाशेजारील परिसरात गावठी दारू गुत्त्यामधून दारूची विक्री केली जात आहे. बहुळ गावच्या हद्दीत एक-दोन ठिकाणी दारूगुत्ते असून, मोहितेवाडी, साबळेवाडी, दावडी, वाफगाव, चिंचोशी आदी परिसरात दारूच्या गुत्त्यांमधून मोठ्या प्रमाणात गावठी दारूची विक्री होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भीमा-भामा नदीच्या पात्रात दारू व्यावसायिकांनी विनापरवाना गावठी दारू तयार करण्याचे गुत्ते थाटले आहेत. वडगाव-घेनंद गावात २ वर्षांपूर्वी महिलांनी एकत्र येऊन दारूबंदीचा ठराव मंजूर केला होता. मात्र शेजारील गावच्या हद्दीत अज्ञात स्थळी लपून छपून चालणाऱ्या या दारूगुत्त्यांवर कारवाई होत नसल्याने या परिसरातील महिला पोलिसांविरोधात नाराजी व्यक्त करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही दारूगुत्ते बंद केले जात नसल्याने याविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्या निर्मलाताई पानसरे, पंचायत समिती सदस्या वैशाली गव्हाणे, विद्याताई मोहिते, राजश्री मोहिते, सुरेखा मोहिते, रोहिणी मोहिते, वैशाली मोहिते, कल्याणी मोहिते, सुवर्णा मोहिते, जयश्री मोहिते, पूजा मोहिते, कमल दौंडकर, कविता थोरवे, बेबी थोरवे, लक्ष्मीबाई थोरवे, सुनीता दौंडकर, पूनम दौंडकर आदींसह साई स्वयम सहाय्य, संजीवनी, पूजा स्वयम सहाय्य, श्री साई स्वयम सहाय्य महिला बचत गटाच्या महिलांनी दिला आहे.
अवैध धंद्याविरोधात महिला आक्रमक
By admin | Published: April 26, 2017 2:54 AM