लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अपघातात रस्त्यावर पडलेल्या काचांमुळे लोकांना त्रास होऊ शकतो, हे लक्षात घेऊन वाहतूक शाखेच्या महिला काँस्टेबलने झाडु हातात घेऊन रस्ता साफ केला. ऑन ड्युटी असणाऱ्या पुण्यातल्या महिला कॉन्स्टेबल रस्त्यावर झाडू मारत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडिओ पाहून पुणेकर या महिला पोलिसाचं कौतुक करत आहेत.
रजिया फैयाज सय्यद असे या महिला कॉन्स्टेबलचे नाव आहे. त्या खडक वाहतूक विभागात कार्यरत आहेत. पुणे शहरातील नेहमीच गजबजलेल्या एस. पी कॉलेज चौकात रिक्षा आणि दुचाकीस्वाराची समोरासमोर धडक झाली. सुदैवाने झालेल्या या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. परंतु, दुचाकी अणि रिक्षा यांच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले. यामुळे भर चौकात रस्त्यावर काचांचा खच साचला होता.
सय्यद या तिथे ड्युटीवर होत्या. अपघात झाल्याचे कळताच त्यांनी वाहतूक तर सुरळीत करून दिली. परंतु याचबरोबर रस्त्यावर साचलेल्या काचांमुळे इतरांना त्याचा त्रास होऊन जखमी होऊ शकतात हे लक्षात घेऊन त्यांनी शेजारीच असलेल्या अमृततुल्य दुकानातून झाडू घेतला. स्वतःच्या हाताने रस्त्यावरच्या काचा बाजूला केल्या. या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानतेमुळे अनेक अपघात रोखले गेले. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटकर्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
.............
फोटो ट्रॉफिक लेडी