इंदापूर/ बाभूळगाव : महिला डॉक्टर व परिचारिका आमच्या रुग्णाकडे लक्ष देत नाहीत म्हणून दोन युवकांनी रुग्णालयातील प्रतिबंधित कोविड वॉर्डमध्ये जावून, रुग्णास आणलेल्या औषधाचा ट्रे फेकून देत, रुग्णालयात अंतरवासिता (इंटर्नशिप) करत असलेल्या महिला डॉक्टर व एका परिचारिकेला शिवीगाळ करून दमदाटी करत मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार शनिवार (दि. ८ मे) रोजी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात घडला आहे.
याबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात सुनील चंद्रकांत रणखांबे व रवी चंद्रकांत रणखांबे (दोघेही रा. पंचायत समिती कॉलनी, इंदापूर) या दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, कोरोनाच्या काळात रात्रंदिवस रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिका यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे कोविडसाठी काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता संभाजी कोडग (वय २३) रा. बिबवेवाडी, पुणे (सध्या रा. उपजिल्हा रुग्णालय वसाहत, इंदापूर ) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केले आहे की, बुधवार दि. ५ मे रोजी चंद्रकांत चन्नापा रणखांबे ( वय ५६ ) हे कोरोना बाधित असल्याने, उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यावेळी त्यांची ऑक्सिजन पातळी प्रचंड खालावलेली होती. त्यांना व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता भासत होती. त्यांची ऑक्सिजन पातळी ७० पेक्षा कमी होती. त्यावेळी पेशंटचे नातेवाईकांना, आम्ही व्हेंटिलेटर शिल्लक नाहीत याची वेळोवेळी पूर्वकल्पना दिली होती. शनिवार (दि. ८) रोजी मी दिवसपाळी ड्युटीवर असल्याने सकाळी ८ वाजता उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे कर्तव्याकरिता हजर झाले.
त्यावेळी माझ्यासोबत परिचारिका अंजली पवार व सौमय्या बागवान होते. आमच्या वॉर्डमध्ये साधारण १२ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामध्ये चंद्रकांत रणखांबे यांच्यावरही औषधोपचार चालू होते. शनिवारी दुपारी १२.३० वाजता या रुग्णाचे नातेवाईक यांनी परिचारिका अंजली पवार यांना रुग्णाची तब्येत खराब होत असल्याबाबत सांगितल्याने, त्या रुग्णाला औषधउपचार करण्यासाठी मी पहिल्यांदाच तपासणीसाठी गेले असता, त्या रुग्णाची ऑक्सिजन पातळी ही वारंवार खालवत होती. याबाबतची नोंद केस पेपरमध्ये होती.
त्यानंतर त्या रुग्णाची ऑक्सिजन पातळी वाढविण्याची औषधे त्यांना दिली, त्याचवेळी तेथे पेशंटचे नातेवाईक सुनील रणखांबे व रवी रणखांबे कोविड वॉर्डमध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध असताना, जबरदस्तीने वॉर्डमध्ये प्रवेश करून आत आले. त्यावेळी मी पेशंटचे पल्स तपासणी करीत होते. त्यावेळी सुनील रणखांबे म्हणाले तुम्ही माझ्या वडिलांवर व्यवस्थित औषधोपचार करीत नाहीत, असे म्हणून, माझा उजवा हात धरून, पिरगाळून मला त्याने दुसऱ्या हाताने, माझ्या डाव्या गालावर चापट मारली.
त्यानंतर आणखी मारहाण करण्यासाठी अंगावर धावून येऊन हाताने ढकलून दिले. त्याचवेळी पेशंटला इंजेक्शन देत असलेल्या परिचारिका अंजली पवार यांना देखील हाताने मारहाण करून त्यांच्या गळ्याजवळ जखम करून, आम्हाला शिवीगाळ दमदाटी करून पेशंटचे जवळ असलेला औषधाचा ट्रे फेकून दिला व औषधाचे नुकसान केले. त्यावेळी त्याच्या सोबत असणारा त्याचा भाऊ रवी रणखांबे यांने देखील शिवीगाळ, दमदाटी करून आम्हाला जिवे मारण्याची धमकी देऊ लागल्याने, मी तसेच सिस्टर अंजली पवार असे तेथून वॉर्डच्या बाहेर येऊन थांबलो.
त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, डॉ. सुहास शेळके, परिचारिका वृषाली नवगिरे व इतर सहकारी स्टाफ तेथे आले. त्यानंतर आम्ही सर्वजण कार्यालयात येऊन, डॉ. चंदनशिवेशी चर्चा केली. त्याचवेळी पेशंट चंद्रकांत रणखांबे हे मयत झाल्याबाबत समजले. पेशंटला त्याचे नातेवाईक यांनी औषधोपचार करून दिले असते तर सदरचा पेशंटचा जीव वाचवता आले असते नातेवाईक यांनी पेशंटवर औषधोपचार करू दिले असते तर कदाचित पेशंट वाचले असते. अशा आशयाची फिर्याद इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
___________________________________________________
दोन आरोपींवर सोळा प्रकारचे कलम दाखल
सदर गुन्ह्यातील दोन आरोपी यांच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात, भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ३४, ३५३, ३२३, ३३२, ४२७, ४५१, ४५२, ५०४, ५०६, १८८, २६९, २७० व साथीचे रोग अधिनियम १८९६ कलम ३ व ४, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कलम ५१ आणि महाराष्ट्र सेवा व्यक्ती व संस्था अधिनियम २०१० कलम ४ अशा विविध कलमान्वये सोळा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची सूचना ठरली फोल
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सदर घटनेच्या दोन दिवसांपूर्वी इंदापूर तालुक्यातील कोविड सेंटरला भेट देऊन रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी यांना पोलीस प्रशासनाचे संरक्षण व पाठबळ असल्याचे मत व्यक्त केले होते. मात्र त्यांची ही सूचना दोनच दिवसात फोल ठरली. इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात पोलीस संरक्षण आहे का ? घटनेच्या वेळी पोलीस कोठे होते? महिलांना मारहाण होताना पोलीस काय करत होते? रुग्णालयात कोणते पोलीस अधिकारी व कर्मचारी ड्युटीला होते? हा खरा संशोधनाचा प्रश्न आहे.