पुणे : जुन्नर परिसरामध्ये बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून, मादी बिबटची नसबंदी करावी, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती. त्या मागणीला अनुसरून वन विभागाने केंद्र सरकारकडे मादीच्या नसबंदीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर सकारात्मक विचार होणार असल्याने लवकरच मादी बिबटची नसबंदी होऊ शकणार आहे.
जुन्नर उपवन विभाग क्षेत्रात बिबट प्रजनन नियंत्रण करण्यासाठी सातत्याने वन विभाग प्रयत्न करत आहे. त्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असून, आता मादी व नर बिबटची नसबंदी करण्याचा उपाय करण्यात येणार आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीदेखील मागणी केली होती. संसदेमध्येही त्यांनी हा विषय मांडला होता. राज्याच्या वन्यजीव विभागाने ११ नर आणि ३६ मादी बिबट्यांवर गर्भनिरोधक उपाययोजना करण्यासाठीचा प्रस्ताव केंद्रीय वन विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांकडे सादर करण्यात आला आहे.
जुन्नर उपवन विभाग क्षेत्रातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यात बिबट्यांकडून दररोज हल्ले होत आहेत. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या काही वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढत आहे.
वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक पातळीवर ११ नर आणि ३६ मादी बिबट्यांवर गर्भनिरोधक उपाययोजना करण्याचा प्रस्ताव केंद्रीय वन विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांकडे मान्यतेसाठी सादर केला आहे. या प्रस्तावात वन्यजीव संस्थेच्या सहकार्याने नर आणि मादी बिबट्यांच्या ग्रंथींचा अभ्यास व गर्भनिरोधन यावर भर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर बिबटप्रवण क्षेत्रातील बिबट्यांच्या हालचाली, खाद्य या बाबींचाही अभ्यास केला जाणार आहे. त्यामुळे जर या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळण्यासाठी मदत होणार आहे.
बिबट नसबंदी करण्यासाठी आम्ही प्रस्ताव पाठवला आहे. त्यासाठी देहराडून येथील वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेनेदेखील शिफारस केली आहे. त्यामुळे सरकारकडून याविषयी लवकर निर्णय होऊ शकेल. त्यामुळे बिबट संख्येच्या नियंत्रणासाठी मदत होईल - अमोल सातपुते, उपवनसंरक्षक, जुन्नर वन विभाग