पुणे : दौड पोलीस ठाण्यात पोलीस काँस्टेबल असलेल्या महिलेने धनकवडीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पूजा अमोल सकपाळ ऊर्फ कांबळे (वय २८, रा. तळजाई कॉल्नी, प्रियदर्शनी शाळेसमोर, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पुजा यांच्या मागे पती, सासु सासरे, दीप, साडेतीन वर्षाचा मुलगा आणि ८ महिन्याचे बाळ असा परिवार आहे. पूजा यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. घरगुती कारणावरुन आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुजा सकपाळ दौंड पोलीस ठाण्यात अंमलदार म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्या सुट्टीवर धनकवडी येथे आल्या होत्या. धनकवडी मध्ये त्यांचे तीन मजली घर आहे. पती, दोन मुले आणि सासू साजरे असा परिवार आहे.
रविवारी रात्री उशिरा त्यांनी दुसऱ्या मजल्यावर घरात ओढणीच्या साह्याने आत्महत्या केली. धनकवडी परिसरात त्या कुटुंबासह रहावयास होत्या. त्यांचे एकत्र कुटुंब आहे. रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्या त्यांच्या दुसर्या मजल्यावरील रूममध्ये गेल्या. त्या परत खाली न आल्याने त्यांच्या पती वर गेले. दरवाजा बंद असल्याने त्यांनी आवाज दिला. पूजा यांनी आतून प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी खिडकी उघडून पाहिले. आत काही दिसून आले नाही. त्यामुळे त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी पूजा यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने पूजा यांना भारती हॉस्पिटलमध्ये नेले.
परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आला आहे. सहकारनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली आहे.