मंचर : अतिउष्णता व मुसळधार पाऊस यामुळे मेथी व कोथिंबिरीची मर होत असल्याने आवक कमी होऊन बाजारभाव वाढले आहेत. मेथीची जुडी ३५ रुपयांना, तर कोथिंबिरीची जुुडी १४ रुपयांना मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत विकली गेली.कमी दिवसांत येणारे पिक म्हणून मेथी-कोथिंबीर पिकांचे उत्पादन शेतकरी घेतात. परतीचा मुसळधार पाऊस पडला. पावसाच्या तडाख्याने अनेक ठिकाणी मेथी-कोथिंबीर पिकांचे नुकसान झाले आहे. आॅक्टोबर हीटमुळे उष्णता वाढली आहे. दिवसभर कडक ऊन पडते. त्यामुळे मेथी कोथिंबीर मर होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, दोन्ही पिकांची आवक घटली आहे. आवक कमी होत असल्याने मेथी व कोथिंबीर यांचे बाजारभाव कडाडले आहेत.मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत मेथी-कोथिंबिरीची आवक कमी झाली आहे. मेथीला शेकडा १२०० ते ३५०० रुपये भाव मिळाला, तर कोथिंबिरीला १०० ते १४०० रुपये शेकडा भाव मिळाला. पावसाने कोथिंबीर भिजल्याने ती खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. भिजलेली कोथिंबीर मुंबई येथील बाजारात पोहोचू शकत नाही. तसेच, कोथिंबिरीची पाने खराब झाली आहेत. पावसाने पानांवर मोठ्या प्रमाणावर टीक पडली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या कोथिंबिरीला खूपच कमी बाजारभाव मिळतो.काही शेतकऱ्यांना १ रुपया जुडी भाव मिळाला. शेपूला शेकडा ४०० ते १५००, तर कांदापातीला ४०० ते १२०० रुपये शेकडा भाव मिळाला. दरम्यान मेथी, कोथिंबीर यांचे बाजारभाव सध्या स्थिर राहतील. दिवाळी सणाच्या वेळी कोथिंबिरीचे बाजारभाव वाढण्याची शक्यता व्यापारी संदीप गांजाळे यांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)
मेथी ३५, कोथिंबीर १४ रुपये जुुडी
By admin | Published: October 15, 2015 12:54 AM