पुणे : पुणे शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांमधील एक असलेला तसेच तरुणांच्या अाकर्षणाचा असलेल्या फर्ग्युसन रस्त्याचा वेग मंदावल्याचे चित्र अाहे. दरराेज वाढणारी वाहनांची संख्या, पदपथाचे चालू असलेले काम अाणि करण्यात येणारी डबल पार्किंग यामुळे या रस्त्यावरील वाहतूकीचा वेग मंदावला अाहे.
नेहमीच वर्दळीचा म्हणून फर्ग्युसन रस्ता अाेळखला जाताे. खास करुन यात तरुणांची संख्या अधिक असते. शनिवार ,रविवार तर या रस्त्याला जत्रेचे स्वरुप येत असते. या रस्त्यावरील वाढत्या वाहन संख्येमुळे या रस्त्यावर वाहतूक काेंडी नित्याचीच झाली अाहे. त्याचबराेबर डबल पार्किंग करण्यात येणाऱ्या चारचाकींमुळे रस्ता वाहतूकीस अपुरा पडत अाहे. त्यातच जंगली महाराज रस्त्याप्रमाणे फर्ग्युसन रस्त्यावरील पदपथांचे रुंदीकरण महापालिकेकडून करण्यात येत अाहे. त्यामुळे पादचारी हे रस्त्यावरुन चालत अाहेत.
फर्ग्युसन रस्त्याबराेबरच अातील जाेड रस्त्यांवरही दिवस रात्र वाहतूक काेंडी हाेत असल्याचे दिसून येत अाहे. वाहनांच्या माेठ्याच माेठ्या रांगा प्रभात राेड, भांडारकर राेड, तसेच बीएमसीसी राेडवर पाहायला मिळत आहेत. फर्ग्युसन व जे एम रस्त्यावरील हाॅटेल, दुकाने व स्ट्रीट फूडमुळे या रस्त्यांना एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले अाहे. महाविद्यालयीन तरुणांचा अाेढा या रस्त्यांकडे असताे. त्यातच या रस्त्यांना जाेडणाऱ्या जाेड रस्त्यांवर दुचाकी कशाही प्रकारे लावलेल्या असतात. अनेक महत्त्वाची कार्यालये सुद्धा या भागात अाहेत. पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फारशी सक्षम नसल्याने नागरिक हे खासगी वाहनांचा वापर करत अाहेत. वाहतूक काेंडीबराेबरच ध्वनी अाणि वायू प्रदूषणही या भागात माेठ्याप्रमाणावर वाढले अाहे. वाढत्या वाहनसंख्येवर लवकरत उपाय याेजना करणे गरजेचे असल्याचे मत काही नागरिकांनी व्यक्त केले.