उत्सवकाळात रात्रीही होणार शहरस्वच्छता, स्तनदा मातांना स्वतंत्र कक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 01:14 AM2018-09-13T01:14:02+5:302018-09-13T01:14:17+5:30
गणेशोत्सवाच्या काळात शहरातील रस्ते, तसेच चौकांची स्वच्छता रात्रीच्या वेळेसही करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे.
पुणे : गणेशोत्सवाच्या काळात शहरातील रस्ते, तसेच चौकांची स्वच्छता रात्रीच्या वेळेसही करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. रात्रीच्या वेळेस देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या गर्दीतील स्तनदा मातांसाठी काही ठिकाणी स्वतंत्र कक्ष सुरू करण्याचाही
निर्णय घेण्यात आला आहे. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीत उत्सवकाळातील तयारीची माहिती घेण्यात आली.
महापालिका आयुक्त सौरभ राव तसेच सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. मंडप परवानगीसाठी अद्याप अनेक मंडळांनी अर्ज केलेले नाहीत. १३ सप्टेंबरपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत असे अर्ज आॅनलाईन स्वीकारले जाणार आहेत, असे या वेळी आयुक्तांनी सांगितले. उत्सवकाळात शहरातील रस्त्यांवर भाविकांची गर्दी असते. त्यामुळे रस्ते अस्वच्छ होतात. कचरा साचून राहतो. त्यासाठी रात्रीच रस्ते स्वच्छ करण्याच्या कामाचेही नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून काम झाले आहे किंवा नाही, याची पाहणी वरिष्ठ स्तरावरील अधिकारी रात्री १२ ते ३ यावेळेत करणार असून त्यासाठीही शहराचे विभाग करून अधिकाºयांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
बैठकीला सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, उपायुक्त माधव जगताप, विजय दहिभाते, संध्या गागरे,
उमेश माळी, व्ही. जी. कुलकर्णी, श्रीनिवास कंदूल, अनिरुद्ध पावसकर, शिवाजी लंके, प्रशांत रणपिसे,
डॉ. सुनील आंधळे, आपत्ती निवारण विभागाचे प्रमुख गणेश सोनुने आदी उपस्थित होते.