पुणे : ज्याचे आमदार जास्त त्या पक्षाला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळावे, अशी मागणी केली जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुणे जिल्ह्यात २१ सर्वाधिक म्हणजे ९ भाजपचे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी झाले आहेत. पालकमंत्री पदावरून भाजप आग्रही आहेच, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटानेही पालकमंत्रीपद मिळावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील या दाेन दादांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे. प्रत्यक्षात पालकमंत्रीपदाची माळ कोणाच्या दादाच्या गळ्यात पडणार, यावरून पुण्याचा दादा काेण? हे स्पष्ट हाेणार आहे. लवकरच याबाबतचे चित्र स्पष्ट हाेईल, असे दिसते.
विधानसभा निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, उद्धवसेना यांची महाविकास आघाडी विरूद्ध भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिंदेसेना यांची महायुती अशी झाली. पुणे जिल्ह्यावर आजवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. पण, आता राष्ट्रवादी पक्ष फुटला आणि शरदचंद्र पवार गट व अजित पवार गट असे दाेन गट तयार झाले. परिणामी २१ आमदारपैकी भाजपचे ९, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ८, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे १, शिंदेसेनेचे १, उद्धवसेनेचे १ आणि अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटापेक्षा भाजपकडे जिल्ह्यात एक आमदार जास्त आहे. त्यामुळे भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असावे, अशी मागणी भाजपचे कार्यकर्ते करत आहेत. पुणे जिल्हा हा अजित पवार यांचा बालेकिल्ला आहे. पुण्यात प्रशासकीय वर्चस्व अजित पवार यांचे आहे. त्यामुळे अजित पवार यांनाच पुण्याचे पालकमंत्रीपद द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे पुण्याच्या पालकमंत्रीपदी कोणते दादा बसणार यांची चर्चा राजकीय वतुळात सुरू आहे.