पुणे: दरवर्षी १५ जूनला शाळा सुरु होते. त्यानुसार शासनाच्या वतीने समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशीच मोफत पाठपुस्तके दिली जातात. परंतु यंदा शाळा सुरु होऊन पंधरा दिवस झाल्यानंतर बालभारतीच्या वतीने पाठयपुस्तक पुरवठा शुभारंभ झाला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ बालभारती येथे करण्यात आला.
यावेळी बालभारतीचे संचालक दिनकर पाटील, प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रेय जगताप, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर, बालभारतीचे नियंत्रक विवेक गोसावी आदी उपस्थित होते.
शासनाच्या वतीने दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठयपुस्तकांचे वाटप केले जाते. यावर्षी पाठ्यपुस्तकांच्या छपाईसाठी आवश्यक असणाऱ्या कागदासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल झाल्यामुळे पुस्तक छपाईस विलंब झाला होता. सदर न्यायालयीन प्रकरण निकालात निघाल्याने आता पुस्तक छपाई व पुरवठा सुरळीत सुरु झाला आहे. प्रथम टप्प्यात राज्याच्या दुर्गम भागात पुस्तकांचे वितरण होणार आहे. उर्वरित ठिकाणी देखील लवकरच पाठयपुस्तके उपलब्ध होतील, अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच पाठ्यपुस्तक मंडळाने पहिली ते बारावीच्या सर्व पुस्तकांच्या पीडीएफ फाईल बालभारतीच्या वेबसाईटवर मोफत उपलब्ध करून दिल्या असून आजवर सुमारे १ कोटी ७८ लाख पुस्तके डाऊनलोड झाल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.