शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे पेट्रोलपंप व इतर ठिकाणची रक्कम घेऊन शिरूर येथे जात असलेल्या रेडियंट कॅश मॅनेजमेंट कंपनीच्या युवकाला २० नोव्हेंबर रोजी दोन अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या चाकूने वार करून त्याच्याकडील पंधरा लाख तीनशे रुपये रक्कम लुटून नेली होती. यातील आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागास नुकतेच यश आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.२० नोव्हेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास शिरूरकडे जात असलेल्या मोहसीन तांबोळी याला दोन युवकांनी चाकूने वार करून त्याच्याकडील पंधरा लाख तीनशे रुपयांची रक्कम चोरून नेली होती. या गुन्ह्याचा तपास लावणे पोलिसांपुढे एक आव्हान निर्माण झाले होते.यांनतर पोलिसांनी शिक्रापूर परिसरामध्ये असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. या वेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर, पोलीस हवालदार सुनील बांदल, पोलीस नाईक पोपट गायकवाड, राजू मोमीन, दत्तात्रय जगताप, रौप इनामदार, महेश गायकवाड, नीलेश कदम, सुभाष राऊत, सचिन गायकवाड, कुंतेय खराडे, रवी शिनगारे, विशाल साळुंके, सागर चंद्रशेखर, बाळासाहेब खडके सर्व जण आरोपींचा शोध घेत असताना यामध्ये दोन आरोपी नसून जास्त आरोपी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना मिळाली. यांनतर त्या आरोपींकडे एक स्कॉर्पिओदेखील असल्याची माहिती मिळाली, यांनतर त्या आरोपींनी लुटलेले पैसे घेऊन ती स्कॉर्पिओ नगर बाजूने पुणे बाजूकडे येत असल्याची माहिती वरील पोलिसांना मिळाली. त्यांनतर पोलिसांनी न्हावरा फाटा शिरूर येथे सापळा रचून स्कॉर्पिओ अडविली.त्यांनतर तपासणी केली असता त्या स्कॉर्पिओमध्ये संशयित असलेले महेश ऊर्फ गोट्या लक्ष्मण बुट्टे (वय २४, रा. बजरंगवाडी, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे), शुभम अनिल सासवडे (वय २१, रा. शिक्रापूर, बजरंगवाडी, ता. शिरूर), गजानन प्रकाश शिंदे (वय १९, रा. शिक्रापूर, ता. शिरूर, मूळ रा. उमरखोजा, ता. हिंगोली, जि. हिंगोली), शुभम ऊर्फ विक्की विठ्ठल जाधव (वय २३, रा. शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. नरवाळ, ता. धुळे) यांना ताब्यात घेतले. त्यांनी त्यांच्या अजूनही तीन साथीदारांची नावे सांगितली. त्यांनतर पोलिसांनी शुभम ऊर्फ चिकण्या विष्णू जाधव (वय २१, रा. मोरगव्हाण, ता. नेवासा, जि. अहमदनगर), सचिन दिलीप राक्षे (वय २४, रा. बाजारतळ, आंबेगाव, आंबेगाव, मूळ रा. राक्षेवाडी, ता. खेड), नंदलाल ऊर्फ एनडी दिलीप होले (वय २३, रा. ठाकूरपिंपरी, ता. खेड) यांना देखील नगर, आंबेगाव येथून ताब्यात घेतले आहे.
पंधरा लाखांची रोकड लुटणारे गजाआड, गुन्हे अन्वेषणची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 2:33 AM