लोणी काळभोर: पंधरा वर्षाच्या लहान मुलीला बदनाम करण्याची धमकी देऊन तिच्या इच्छेविरूद्ध शारीरीक संबंध प्रस्थापित करणाऱ्या तरूणाविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाच्या असल्या वाईट कृत्याने मुलगी साडेपाच महिन्याची गरोदर असल्याचे समोर आले आहे.
मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून चेतन वसंतराव कोटमाळे ( वय २७, रा. आळंदी रोड, पुणे ) याच्याविरोधात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ वर्षांची मुलगी आपल्या आईबरोबर मामाकडे राहत आहे. गेल्या २, ३ महिन्यांपासून मुलगी व्यवस्थित जेवण करत नसल्याचे मामीच्या लक्षात आले. मामीने तिला विचारल्यावर ती काहीच सांगण्यास तयार नव्हती. मुलीचे दात दुखत असल्याने ती जेवत नसेल असे त्यांना वाटले. त्यानंतर तिला तपासणी करण्यासाठी १५ मेला रूग्णालयात नेले. सोनोग्राफी रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी ती साडेपाच महिन्याची गरोदर असल्याचे सांगितले. त्यानंतर आई व मामीने तिला विश्वासात घेऊन विचारणा केली. तिने चेतन आणि तिच्यामधील घडलेला सर्व प्रकार सांगितला.
चेतन हा मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये घरी येत असे. त्यामुळे त्याच्याबरोबर मुलीची ओळख झाली. त्यानंतर त्याने मुलीला मोबाईल नंबर मागितला. पण तिने नकार दिल्यावर बदनामी करण्याची धमकी दिली. त्यावर घाबरून मुलीने आजीचा मोबाईल नंबर त्याला दिला. वारंवार फोन करुन तो मुलीला प्रेम असल्याचे सांगू लागला. तसेच इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवण्याचे बोलू लागला. एके दिवशी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घरातील सर्वजण झोपल्यावर त्याने फोन करुन टेरेसवर बोलवले. तिने वाईट कृत्य करण्यास नकार दिल्यावर बदनामी करण्याची धमकी दिली. त्याच क्षणी त्याने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतरही परत याची पुनरावृत्ती झाली. असे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आईने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.