पुणे : शहरात सलग पाचव्यांदा ऑल आऊट कॉम्बिंग ऑपरेशन शुक्रवारी रात्री राबिवण्यात आले असून त्यात १९०० गुन्हेगार चेक करण्यात आले. या कारवाईत ६७ गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून कोयते, तलवारी, चॉपर, पालघन, सत्तूर अशी ३७ हत्यारे जप्त करण्यात आली. याबरोबरच तडीपारीचा भंग करुन शहरात आलेल्या ११ तडीपारांना अटक करण्यात आली.पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेने शुक्रवारी शहरात रात्री आठ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
आर्म ॲक्टनुसार ३४ केसेस करुन ३६ आरोपींना अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून २६ काेयते, ५ तलवारी, १ चॉपर, ५ पालघन, १ सत्तूर, १ सुरा अशी ३७ हत्यारे पकडण्यात आली. या मोहिमेत २८१ तडीपार गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ११ तडीपार शहरात वास्तव्य करत असल्याचे आढळून आले. त्यांना अटक केली. संशयितरित्या फिरणाऱ्या १५ जणांवर कारवाई केली गेली. परिमंडळ १ मधील ६ केसेसमध्ये दोन आरोपींवर अजामीनपात्र वॉरंट बजावून त्यांना अटक केली. परिमंडळ ४ मध्ये ७ केसेसमध्ये एका आरोपीवर अजामीनपात्र वाॅरंट बजावून व दोन केसेसमध्ये जामीनपात्र वॉरंट बजावले.
या माहिमेत अंमली पदार्थविरोधी पथकाने दोघांना अटक करुन त्यांच्याकडून ३० ग्रॅम ब्राऊन शुगर, ४० मिलीग्रॉम अफीम, १६० ग्रॅम अफीम बोंडे असा २ लाख ३८ हजार ९४० रुपयांचा माल हस्तगत केला. तसेच दोघा आरोपींकडून २२ हजार रुपयांच्या बेकायदा सिगारेट जप्त केल्या.
दारू बंदी कायद्यान्वये ५ जणांना अटक करुन त्यांच्या ताब्यातून ४६ लिटर गावठी दारु जप्त केली गेली.गुन्हेगार चेकींग अभियानामध्ये एकूण १९०० गुन्हेगारांना चेक करण्यात आले असून त्यापैकी ६४२ गुन्हेगार मिळून आले. प्रतिबंधक कारवाईच्या ४७१ केसेस करुन ४६९ आरोपींवर कारवाई करण्यात आली.
गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने कोथरुडमधील दंग्याच्या गुन्ह्यातील १० आरोपींना अटक केली. युनिट ४ ने दोन आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून गुटखा व कार असा १६ लाख रुपयांचा माल जप्त केला.