लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवलेले पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू होण्याचा मार्ग शासनाने मोकळा केला आहे. मात्र त्यासाठी पालकांना संमतीपत्र द्यावे लागणार आहे. आहेत. शिक्षकांची कोरोना तपासणी झाल्यानंतर २७ जानेवारीपासून शाळा सुरु करण्यास अनुमती देणारा अध्यादेश शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केला आहे.
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करून शाळा सुरू करणे शक्य आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये; त्याचा मानसिक परिणाम विद्यार्थी व पालकांवर होऊ नये, या हेतूने शाळा सुरू केल्या जात आहेत.
कोरोनामुळे आठ महिने बंद असलेले नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली. सुरुवातीला शाळांमध्ये विद्यार्थी उपस्थित राहत नव्हते. परंतु,गेल्या काही दिवसांपासून शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत आहे. ग्रामीण भागातील काही शाळांत ही उपस्थिती ६० ते ७० टक्क्यांवर गेली आहे. मात्र, शहरी भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत अजूनही वाढ झालेली नाही. त्यामुळे शासनाने पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी पालक-विद्यार्थ्यांकडून त्यास कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
चौकट
शिक्षकांची तपासणी अनिवार्य
“शिक्षकांच्या कोरोना तपासणीसह सर्व आवश्यक बाबी स्थानिक जिल्हा प्रशासन पूर्ण करणार आहे. नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी प्रसिध्द मार्गदर्शक सूचना पाचवी ते आठवीपर्यंतच्या वर्गांसाठी लागू आहेत. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढ होण्यासाठी शिक्षकांकडून पालकांचे प्रबोधन केले जात आहे. त्यामुळे टप्प्या-टप्प्याने विद्यार्थी उपस्थितीत वाढेल.”
- विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र