Hadapsar Vidhan Sabha 2024: राज्यातील पाचवा सर्वात कमी मतदानाचा मतदारसंघ; हडपसरमध्ये केवळ ५०.११ टक्के नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 01:55 PM2024-11-22T13:55:23+5:302024-11-22T13:56:41+5:30

हडपसर मतदारसंघात २०१९ मध्ये ४७.२३ टक्के मतदान झाले होते, त्या तुलनेत यंदा केवळ २.८८ टक्क्यांची वाढ झाली

Fifth lowest polling constituency in the state; Only 50.11 percent recorded in Hadapsar | Hadapsar Vidhan Sabha 2024: राज्यातील पाचवा सर्वात कमी मतदानाचा मतदारसंघ; हडपसरमध्ये केवळ ५०.११ टक्के नोंद

Hadapsar Vidhan Sabha 2024: राज्यातील पाचवा सर्वात कमी मतदानाचा मतदारसंघ; हडपसरमध्ये केवळ ५०.११ टक्के नोंद

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि. २०) झालेल्या मतदानात मुंबई व पुणे जिल्ह्यात सर्वात कमी मतदानाची नोंद झाली. मात्र, राज्यातील पाचव्या सर्वात कमी मतदानाची नोंद पुण्यातील हडपसर मतदारसंघात झाली. अर्थातच हडपसर मतदारसंघातील ५०.११ टक्के मतदान जिल्ह्यातीलही सर्वात कमी ठरले. राज्यात सर्वात कमी मतदानात सहाव्या क्रमांकावर शिवाजीनगर मतदारसंघ आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वात कमी ४३.४३ टक्के मतदान पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात झाले होते.

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात बुधवारी मतदान झाले. त्यात सरासरी ६५.११ टक्के मतदानाची नोंद झाली, तर सर्वात कमी मतदान मुंबई शहर जिल्ह्यात ५२.०७, तर मुंबई उपनगर जिल्ह्यात ५५.७७ टक्के झाले. तर ठाण्यात ५६.०५ टक्के मतदान नोंदविण्यात आले. त्यानंतर पुणे जिल्ह्याचा क्रमांक असून, जिल्ह्यात ६१.०५ टक्के सरासरी मतदान झाले. मतदानाची ही आकडेवारी केवळ ईव्हीएमद्वारे झालेल्या मतांची असून, त्यात पोस्टल मतांची भर घातली जाणार आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का आणखी वाढणार आहे. मात्र, त्यात फारशी वाढ होणार नाही, असे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.

जिल्ह्यातील मतदानाच्या आकडेवारीनुसार सर्वात कमी मतदान हडपसर मतदारसंघात ५०.११ टक्के झाले आहे. राज्यातील हे मतदान पाचवे सर्वात कमी मतदान ठरले आहे. राज्यात सर्वात कमी मतदान कुलाबा मतदारसंघात ४४.४९ टक्के झाले आहे. त्याखालोखाल भिवंडी पूर्व ४९.२०, धारावी ४९.७०, चांदिवली ५०.०७ टक्के मतदान झाले आहे, तर सहाव्या क्रमांकावर पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर मतदारसंघ आहे. येथेही हडपसरपेक्षा थोडे जास्त अर्थात ५०.९० टक्के मतदान झाले आहे.

हडपसर मतदारसंघात २०१९ मध्ये ४७.२३ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत यंदा केवळ २.८८ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, २००९ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेतून तयार झालेल्या या मतदारसंघात २००९ मध्येही ४५.४२ टक्केच मतदान नोंदविण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या २०१४च्या निवडणुकीत मात्र, ५२.३५ टक्के मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या शिवाजीनगर मतदारसंघात २०१४चा अपवाद वगळता २००९ व २०१९ मध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले होते. शिवाजीनगर मतदारसंघात २००९ मध्ये ४२.८५, २०१४ मध्ये ५१.९५, तर २०१९ मध्ये ४३.८६ टक्के मतदान झाले होते.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शहरी मतदारांची अनास्था ही मतदानाची टक्केवारी घटण्यास कारणीभूत ठरत असल्याचे म्हटले होते. मतदान कमी झालेल्या शहरी भागांमध्ये प्रामुख्याने मुंबई, ठाणे व पुणे शहरांचा समावेश आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मतदारांची जागृती, मतदार याद्यांचे शुद्धीकरण, मतदान केंद्रांची सुसूत्रता याचे नियोजन करण्यात आले. त्यामुुळे गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेतही मतदान जास्त झाल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.

Web Title: Fifth lowest polling constituency in the state; Only 50.11 percent recorded in Hadapsar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.