लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा शहरासह, पिंपरी-चिंचवड शहरात व जिल्ह्यातील ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे़ त्यातच शुक्रवारी शहरातील अनेक लसीकरण केंद्रांवर लसीकरण थांबले होते़ याची दखल घेत केंद्र शासनाने थेट पुणे जिल्ह्याला शुक्रवारी रात्री २ लाख ४८ हजार, तर येत्या रविवारी आणखी सव्वालाख लसीचे डोस उपलब्ध करून दिले आहेत़ केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या प्रयत्नातून पुणे जिल्ह्याला हे डोस उपलब्ध झाले असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली़
मोेहोळ म्हणाले, लसींच्या तुटवड्यामुळे मागील दोन दिवसांपासून लसीकरण प्रकियेत अडथळे आले होेते, तसेच आजही काही लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागली, ही वस्तुस्थिती आहे. लसीकरणासाठी लस उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे महापालिकेकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता.’’
दरम्यान, शुक्रवारी अनेक लसीकरण केंद्रावर नोंदणी केलेल्या नागरिकांना लस न घेताच घरी परतावे लागले. कारण साठाच संपलेला होता. काही केंद्रावर तर प्रचंड गर्दी झालेली होती. महापालिकेच्या कमला नेहरू रूग्णालयात सकाळपासूनच नागरिकांनी मोठी रांग लावली होती.
------------------------
एकूण लसीत शहराला ४० टक्के वाटा
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशीही पत्र व्यवहार करण्यात आला होता. त्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, शुक्रवारी रात्री पुणे जिल्ह्यासाठी २ लाख ४८ हजार डोस तसेच रविवारी सव्वालाख डोस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे़ त्यानुसार शुक्रवारी रात्री या लस मिळणार आहेत. यापैकी प्रत्येकी ४० टक्के लस पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी तसेच २० टक्के लस या पिंपरी चिंचवडसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
------------------------------