धायरी: जगभरात सध्या कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असून अनेकजण त्यात बळी पडत आहेत. परंतु इच्छाशक्ती आणि आध्यत्मिकतेच्या जोरावर धायरी येथील ठकूबाई नारायण बेनकर या ८० वर्षाच्या आजीने तब्बल ३४ दिवस लढा देत कोरोनावर मात केली आहे. आजींना मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर त्यांच्या परिवाराने त्यांचे मोठ्या उत्साहात आणि आनंदाने स्वागत केले.
बेनकर यांना काही दिवसांपूर्वी खोकल्याचा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांच्या परिवाराने त्वरित त्यांची कोरोना चाचणी करून घेतली. त्यांचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आला. त्यानंतर आजींना कर्वे रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात १५ एप्रिलला दाखल करण्यात आले होते. बेनकर यांना रक्तदाब आणि मधुमेह आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर दोनदा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती आणि त्यांचा स्कोर ९ आला होता. त्यामुळे त्यांना आयसीयुमध्ये शिफ्ट करण्यात आले होते.
तब्बल १८ दिवस आयसीयुमध्ये उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत गेली. त्यानंतर त्यांना कोव्हीड वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. यावेळी आठ दिवस याठिकाणी उपचार घेत असताना कोरोना संसर्ग आटोक्यात आला होता. कोरोना संसर्गाची लक्षणे कमी झाल्यानंतर त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. तिथून नऊ दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी रुग्णालयात उपचार घेत असताना आजींनी सकारात्मक विचार करत आध्यत्मिकतेचा जप केला. तसेच त्यांच्या परिवाराने देखील वेळोवेळी सकारात्मक विचार करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे आजीने कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली.
२३ वेळा पायी केली विठ्ठलाची वारीपुणे शहराची तहान भागवणाऱ्या खडकवासला धरणाच्या आणि कात्रज येथील बोगदा निर्मितीमध्ये आजींचे योगदान आहे. तसेच त्या वारकरी संप्रदायांच्या असून त्यांनी तब्बल २३ वेळा आळंदी ते पंढरपूर विठ्ठलाची पायी वारी पूर्ण केली आहे.
विठ्ठलाची कृपा असल्यामुळे या महाभयंकर कोरोना संसर्गातून मुक्तता झाली. रुग्णालयात उपचार घेत असताना सातत्याने मी विठ्ठलाचा जप करत होते. तसेच माझ्या परिवाराने देखील वेळोवेळो सकारात्मक विचार करण्यास सांगितले. या सर्व गोष्टींमुळे मी कोरोनाला हरवू शकले. असे ठकूबाई बेनकर यांनी सांगितले आहे.